टिम डेव्हिडविरुद्ध केलेली 'ती' चूक सीएसकेला चांगलीच महागात पडली, ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट
आयपीएल २०२६ मध्ये रविवारी (५ एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) सामना रंगला. हा सामना गमावताच सीएसकेने पराभवाची हॅट्ट्रीक केली. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने सीएसकेसमोर २५१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना सीएसके २०७ धावसंख्येवरच सर्वबाद झाला. यादरम्यान सीएसकेकडून अनेक चुका झाल्या. त्यामध्ये पॉवरप्लेमध्ये विकेट्स गमावणे आणि खराब क्षेत्ररक्षण यांचा समावेश आहे. याबरोबरच संघाने आणखी मोठी चूक केली ती केली नसती, तर सामन्याचा निकाल काही वेगळाच असता.
आरसीबीची फलंदाजी सुरू असताना टिम डेविड १५व्या षटकात फलंदाजीसाठी आला, तेव्हा तो लयीत वाटत नव्हता, कारण त्याने पहिल्या ५ चेंडूंमध्ये केवळ २ धावा केल्या होत्या. १७ व्या षटकात नूर अहमदला सलग तीन षटकार मारल्यानंतर तो लयीत आला. १८ व्या षटकात जेव्हा तो १५ चेंडूत २८ धावांवर होता, तेव्हा त्याला सीएसकेचा वेगवान गोलंदाज अंशुल कंबोजने एका अप्रतिम चेंडूवर बोल्ड केले. ते पाहून डेविडही चकित झाला होता आणि त्याने गोलंदाजाचे कौतुकही केले होते, मात्र अचानक डेविड तंबूकडे परतत असताना थांबला. तिसऱ्या पंचांनी कंबोजचा पाय क्रीजच्या बाहेर असल्याचे सांगितले आणि तो बॉल नो-बॉल घोषित केला.
डेविडने त्या नो-बॉलवर षटकार मारला आणि पुढच्याच चेंडूवर एक धाव घेतली. नंतर त्याने जिमी ओव्हरटनने टाकलेल्या १९ व्या षटकातही त्याची फटकेबाजी सुरूच ठेवली. त्या षटकात त्याने ४ षटकार आणि एक चौकार मारत ३० धावा वसूल केल्या. २० व्या षटकात कंबोजने चांगली गोलंदाजी करत केवळ १३ धावा दिल्या.
यावरून जर कंबोजने तो नो-बॉल टाकला नसता तर सीएसकेने आरसीबीला २२०-२३० धावसंख्येवरच रोकले असते, त्यामुळे त्यांच्यावरील दबाव काहीसा कमी झाला असता. डेविडच्या खेळीबाबत सीएसकेचा कर्णधार ऋतुराज गायकवाड म्हणाला, “अंशुल कंबोजने जवळपास त्याची विकेट घेतली होती, मात्र तो चेंडू अवैध होता. नंतर त्याने सर्व मैदानावर धुमाकूळ घातला.”
सीएसकेचा हा या हंगामातील तिसरा सलग पराभव होता. त्यांनी राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्ज आणि आता आरसीबीविरुद्ध सामने गमावले आहेत. त्यांचा पुढील सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आहे. हा सामना ११ एप्रिलला खेळला जाणार असून या सामन्यात डेवाल्ड ब्रेविस खेळण्याची शक्यता आहे, असे सीएसके हेड कोच स्टीफन फ्लेमिंग यांनी सांगितले आहे.
Comments are closed.