आयपीएलचे सर्व 19 हंगाम खेळणारे केवळ 4 खेळाडू, जाणून घ्या कोण आहेत ते?

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २००८ पासून सुरू झाले आहेत. यामध्ये आतापर्यंत १८ हंगाम खेळून झाले असून १९ व्या हंगामाला २८ मार्चपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेत असे चार खेळाडू आहेत, जे पहिल्या हंगामापासून खेळत आहेत. त्यांचा फॉर्म आणि खेळ पाहता ते दिग्गजांच्या श्रेणीत मोडले जातात. यामध्ये एमएस धोनी, रोहित शर्मा, विराट कोहली आणि मनीष पांडे यांचा समावेश आहे.
एमएस धोनी याने त्याच्या आयपीएल कारकिर्दीची सुरूवात चेन्नई सुपर किंग्जकडून केली. तो २००८ ते २०१५, २०१८ ते २०२६ या दरम्यान चेन्नईचा भाग आहे. त्याने चेन्नईला पाच आयपीएल विजेतेपद जिंकून दिले आहेत. तसेच उर्वरित दोन हंगाम म्हणजे २०१६-१७ तो रायझिंग पुणे सुपरजायंट्कडून खेळला आहे. त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत २७८ सामने खेळले आहेत.
रोहित शर्माने त्याच्या आयपीएल कारकिर्दीची सुरूवात डेक्कन चार्जर्सकडून केली. त्याने २००८ ते २०१० हंगाम डेक्कनकडून खेळले असून २००९ च्या विजेतेपदादरम्यान तो संघाचा भाग राहिला आहे. त्यानंतर तो २०११ ला मुंबई इंडियन्समध्ये गेला असून सध्या त्याच संघासोबत आहे. त्याने या काळात मुंबईचे नेतृत्व करताना संघाला ५ आयपीएल विजेतेपद जिंकून दिले आहेत. त्यामुळे तो ६ आयपीएल चषक जिंकणारा केवळ दुसरात खेळाडू आहे (अंबाती रायुडूने मुंबईसोबत ३ आणि चेन्नईसोबत ३ आयपीएल विजेतेपद जिंकले). तसेच रोहितने आयपीएलचे २७२ सामने खेळले आहेत.
विराट कोहली हा एकमेव खेळाडू आहे जो संपूर्ण १९ हंगाम एकाच आयपीएल फ्रॅंचायजीकडून खेळत आहे. तो २००८ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात आला. त्याने आतापर्यंत आयपीएलचे २६७ सामने खेळले असून तो २०२५ च्या विजेत्या संघाचा भागही होता. आता गतविजेता म्हणून आरसीबी कशी सुरूवात करतो याकडे चाहत्यांचे लक्ष असणार आहे.
या यादीत एक खेळाडू आहे जो रोहित, विराट आणि धोनीप्रमाणे पहिल्या आयपीएल हंगामापासून खेळत आहे. यादरम्यान तो ७ वेगवेगळ्या आयपीएल संघांकडून खेळला. मनीष पांडे याने २००८ मध्ये मुंबई इंडियन्सकडून आयपीएलची सुरूवात केली. त्यानंतर तो २००९-१० हे हंगाम आरसीबी आणि २०११-१३ हे हंगाम पुणे वॉरियर्सकडून खेळला. कोलकाता नाईट रायडर्सकडून तो अधिक हंगाम खेळला आहे. त्यामध्ये २०१४-१७ आणि २०२४-२६ यांचा समावेश आहे. तसेच त्याने २०१८-२१ सनरायझर्स हैद्राबादकडून, २०२२ मध्ये लखनऊ सुपर जायंट्सकडून आणि २०२३ चा हंगाम दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला आहे. या सर्व संघांकडून त्याने एकूण १७४ सामने खेळले आहेत.
हा हंगाम धोनीचा शेवटचा हंगाम असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे २०२७ च्या हंगामात कोण दिसणार याबाबत चर्चा सुरू आहे.
Comments are closed.