सोनम वांगचुक यांच्यावरील आरोप निराधार आहेत.
पत्नी गीतांजली यांचा केंद्र सरकारवर मोठा आरोप :एनएसए प्रकरणात नाही दम
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
हवामान कार्यकर्ते आणि मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित सोनम वांगचूक यांच्या एनएसए अंतर्गत अटकेवरून त्यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी कुठलाच ठोस आधार नाही, याचमुळे सरकार न्यायालयात तारखांवर तारखा मागत असल्याचा दावा गीतांजली यांनी केला आहे.
सोनम वांगचूक यांची अटक केवळ एका व्यक्तीचे प्रकरण नाही, तर हे देशात लोकशाहीची स्थिती दर्शविणारे आहे. जर हे सोनम यांच्यासोबत घडू शकते, तर कुणासोबत देखील घडू शकते. देशासाटी काम करणाऱ्या लोकांना अवैध स्वरुपात ताब्यात घेतले जात आहे. याप्रकरणी समाज आणि राजकीय वर्तुळातून अपेक्षित प्रतिक्रिया उमटली नसल्याचे म्हणत गीतांजली यांनी चिंता व्यक्त केली आहे.
प्रक्रियात्मक डीफॉल्ट
राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या (एनएसए) अंतर्गत आरोपीला 5-10 दिवसांच्या आत सर्व दस्तऐवज उपलब्ध करविणे अपेक्षित असते. परंतु सोनम वांगचूक यांना महत्त्वाचे व्हिडिओ 28 व्या दिवशी उपलब्ध करण्यात आले. हा प्रकार कलम 8 आणि कलम 11 चा स्पष्ट उल्लंघन करणारा असून यामुळे हा कोठडी आदेश प्रारंभापासूनच अवैध ठरत असल्याचा दावा अंगमो यांनी केला.
कॉपी-पेस्ट आहे कोठडी आदेश
जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांचा आदेश पोलिसांकडून पाठविण्यात आलेल्या प्रस्तावाचा कॉपी-पेस्ट आहे आणि यात स्वतंत्रपणे बुद्धी वापरण्यात आलेली नाही. अनेक एफआयआरमध्ये सोनम वांगचूक यांचे नाव नाही आणि ज्या व्हिडिओंचा दाखला देण्यात आला, ते एक ते दीड वर्षे जुने आहेत असे गीतांजली अंगमो यांचे सांगणे आहे.
संसदेत मुद्दा उपस्थित
संसदेत सोनम यांचा मुद्दा उपस्थित करणारे लडाखचे खासदार मोहम्मद हनीफा यांचे मी आभार मानते. परंतु हा मुद्दा तितका जोरकसपणे उपस्थित करण्यात आलेला नाही. लोकांना पक्ष आणि विचारसरणींच्या वर जात एका जबाबदार नागरिकाप्रमाणे विचार करायला हवा असे गीतांजली यांनी देशातील कथित वाढत्या ध्रूवीकरणावर चिंता व्यक्त करताना म्हटले आहे. सोनम यांच्यावरील कारवाईमुळे एचआयएएल आणि एसईसीएमओएलशी निगडित नव्या शैक्षणिक प्रकल्पांना विलंब झाला असून काही देणगीदारांवरही दबाव टाकला जात आहे. परंतु आता अधिक लोक आमच्या संस्थांना ओळखू लागल्याचे गीतांजली यांनी म्हटले आहे.
Comments are closed.