लढाऊ कामगार सेनेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

मुंबई अग्निशमन दल लढाऊ कामगार सेनेची वार्षिक 58वी सर्वसाधारण सभा शुक्रवारी मोठ्या उत्साहात पार पडली. या सभेमध्ये संघटनेच्या 2024-25मधील कार्याचा अहवाल सादर करण्यात आला. तसेच सन 2026 ते 2028करिता बाबा कदम यांची अध्यक्षपदी, किशोरी पेडणेकर यांची सरचिटणीसपदी तर प्रशांत तळेकर यांची कार्याध्यक्षपदी सर्वानुमते पुन्हा निवड करण्यात आली.
लढाऊ कामगार संघटनेच्या माध्यमातून कामगार-कर्मचाऱ्यांसाठी करण्यात येत असलेल्या कामाचा आढावा या वेळी घेण्यात आला. संघटनेच्या प्रयत्नाने मुंबई अग्निशमन दलातील 53 दुय्यम अधिकारी पदे भरण्यात आली आहेत. अग्निशामक या प्रवर्गातील प्रमुख अग्निशामक यांच्या पदोन्नतीकरिता असणारे प्रशिक्षण सेवेच्या आठव्या वर्षी सुरू करण्यात संघटनेला यश आले. दुर्घटनास्थळी धाडशी व प्रशंसनीय काम केल्याबद्दल आयुक्त यांच्या वतीने मिळणारे रजत पदक रकमेमध्ये भरघोस वाढ करण्यात यश प्राप्त झाले. दलातील जवानांना कर्तव्य बजावत असताना मुत्यू किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास दिल्या जाणाऱ्या नुकसानभरपाई रकमेमध्ये 1 कोटीपर्यंत संघटनेच्या मागणीनुसार भरीव रक्कम मंजुरीसाठी प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. असे काम होत असताना इतर संघटना श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या भूलथापांना बळी पडून नका, असे आवाहन या वेळी अध्यक्ष बाबा कदम यांनी केले.
कंत्राटीकरणाला तीव्र विरोध करणार
मुंबई अग्निशमन दलाच्या होणाऱ्या भरती प्रक्रियेमध्ये पुरुष उमेदवार यांची उंची 172 से.मी.ची कमी करून 165 ते 168 से.मी. तसेच महिला उमेदवार यांची उंची 162 से.मी.ची कमी करून 157 से.मी.पर्यंत आणि भरतीपूर्व लेखी परीक्षा घेण्याकरिता संघटनेच्या मागणीनुसार माजी आमदार विलास पोतनीस यांनी विधानसभेत तारांकित प्रश्नाद्वारे केलेल्या मागणीला यश प्राप्त होणार आहे. तसेच कार्यशाळेतील कंत्राटीकरणाविरोधात संघटनेच्या माध्यमातून वरिष्ठ पातळीवर पत्राद्वारे प्रखर विरोध दर्शविला आहे.

Comments are closed.