पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकारचे 'उद्घाटन पाऊल'
सुवेंदू अधिकारी यांच्यासोबत अन्य पाच जणांनी घेतली शपथ : जातीय संतुलन साधण्याचा पक्ष नेतृत्त्वाकडून
पश्चिम बंगालमधील शपथविधी सोहळ्यात शनिवारी सुवेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासोबत इतर पाच मंत्र्यांनीही शपथ घेतली. राज्यपाल आर. एन. रवी यांनी पाच मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. दिलीप घोष, अग्निमित्र पॉल, अशोक कीर्तनिय, खुदीराम टुडू आणि निशिथ प्रमाणिक हे आता पहिल्या टप्प्यात मंत्री झाले आहेत. नवीन सरकारमध्ये ब्राह्मण, आदिवासी, महिला आणि मतुआ यांच्यासह सर्व जातींचा समावेश करण्यात आला आहे. या भव्य-दिव्य शपथविधीचा सोहळा पश्चिम बंगालसाठी एक मोठा दिवस ठरला आहे.
पश्चिम बंगालमध्ये ब्रिगेड परेड ग्राऊंडवर मुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त पाच मंत्र्यांनी शपथ घेतली. खरगपूर सदरचे आमदार दिलीप घोष यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली. तसेच भाजप नेत्या आणि आसनसोल दक्षिणच्या आमदार अग्निमित्रा पॉल यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. भाजपच्या आमदार म्हणून हा त्यांचा दुसरा कार्यकाळ आहे. त्या बंगाओन उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. मतुआ समाजाचे प्रतिनिधित्व करणारे नेते आणि बंगाओन उत्तरचे आमदार अशोक कीर्तनिया यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. त्याव्यतिरिक्त बंगालमधील भाजपचा आदिवासी चेहरा असलेले खुदीराम टुडू यांनीही शपथ घेतली. टुडू हे व्यवसायाने सरकारी शाळेतील शिक्षक आहेत. ते राणीबांध मतदारसंघातून पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले आहेत. पूर्वी कूचबिहारचे खासदार असलेले आणि आता माथाभंगा मतदारसंघाचे आमदार बनलेले निशिथ प्रमाणिक यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात टीएमसीमधून केली होती. ते 2019 मध्ये भारतीय जनता पक्षात सामील झाले होते.
दिलीप घोष : दिलीप घोष हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक राहिले आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजपला एक मजबूत राजकीय शक्ती बनवण्याचे आणि राज्यातील आदिवासी भागांमध्ये व बूथ स्तरावर पक्षाचे तळागाळातील जाळे स्थापित करण्याचे श्रेय त्यांना दिले जाते. स्वत: एक ओबीसी नेते असल्याने त्यांनी राज्यातील मागासलेल्या समाजांना भाजपशी जोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी 2015 ते 2021 या काळात प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहिले. 2016 मध्ये त्यांनी खरगपूर सदर विधानसभा मतदारसंघातून आणि 2019 मध्ये मेदिनीपूरमधून लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला. त्यांची ‘चाय पे चर्चा’ मोहीम बंगालच्या रस्त्यांवर खूप लोकप्रिय झाली. 2026 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी खरगपूर सदर मतदारसंघातून उमेदवारी मिळवत टीएमसीचा पराभव केला.
खुदिराम टुडू : भाजपच्या या आदिवासी नेत्याने 2026 च्या विधानसभा निवडणुकीत बांकुरा जिह्यातील राणीबांध अनुसूचित जमाती (एसटी) राखीव जागा जिंकली. 55 वर्षीय टुडू हे एका शासकीय अनुदानित शाळेत शिक्षक आहेत. त्यांनी 1994 मध्ये विद्यासागर विद्यापीठातून बी.ए. आणि 2000 मध्ये बर्दवान विद्यापीठातून बी.एड. पदवी प्राप्त केली आहे. त्यांची एकूण घोषित मालमत्ता अंदाजे 23 लाख रुपये आहे. त्यांच्यावर कोणताही गुन्हेगारी खटला नाही.
अग्निमित्रा पॉल : या पश्चिम बंगालमधील भाजपच्या राज्य उपाध्यक्ष आहेत. त्या कायस्थ असून हा वर्ग बंगालमध्ये भाजपसाठी एक महत्त्वाचा मतदारगट आहे. त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या तापस बॅनर्जी यांचा 40,839 मतांच्या मोठ्या फरकाने पराभव करून आसनसोल दक्षिण विधानसभा जागा जिंकली. राजकारणात येण्यापूर्वी त्या एक फॅशन डिझायनर होत्या. त्यांच्या शैक्षणिक पात्रतेमध्ये वनस्पतीशास्त्र (ऑनर्स) मधील बी.एस्सी., फॅशन टेक्नॉलॉजीमधील डिप्लोमा आणि एमबीए यांचा समावेश आहे. त्यांच्यावर बेकायदेशीर जमाव आणि हिंसक आंदोलनांशी संबंधित 23 फौजदारी खटले प्रलंबित आहेत, तथापि त्यांना अद्याप कोणत्याही खटल्यात दोषी ठरवण्यात आलेले नाही..
अशोक कीर्तनिय : 2026 च्या निवडणुकीत यांनी उत्तर 24 परगणा जिह्यातील बोंगाव उत्तर या अनुसूचित जातीसाठीच्या राखीव जागेवर तृणमूल काँग्रेसचे बिस्वजीत दास यांचा पराभव करून विजय मिळवला. त्यांनी 2021 च्या विधानसभा निवडणुकीतही त्याच जागेवरून टीएमसीच्या श्यामल रॉय यांचा 10,488 मतांनी पराभव करून विजय मिळवला. ते व्यवसायाने राजकारणी आणि व्यावसायिक आहेत. त्यांनी 1993-94 मध्ये कलकत्ता विद्यापीठातून कला शाखेत बी.ए. पदवी मिळवली. त्यांची एकूण घोषित मालमत्ता अंदाजे 4 कोटी पेक्षा जास्त आहे. ते मतुआ समाजातील एक प्रभावशाली नेते आहेत. त्यांच्यावर तीन गुन्हेगारी खटले प्रलंबित आहेत. या खटल्यांमध्ये हत्येचा प्रयत्न यासारख्या गंभीर आरोपांचा समावेश आहे. तथापि, आतापर्यंत त्यांना कोणत्याही खटल्यात दोषी ठरवण्यात आलेले नाही.
निशिथ प्रमाणिक : हे कूचबिहार भागातील एक प्रमुख नेते असून, त्यांनी 2021 ते 2024 या काळात मोदी सरकारमध्ये केंद्रीय गृह राज्यमंत्री आणि युवा व्यवहार व क्रीडा राज्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे. ते राजवंशी समाजाचे आहेत. 2021 च्या मंत्रिमंडळ फेरबदलादरम्यान ते वयाच्या 35 व्या वर्षी केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्वात तरुण मंत्री बनले. त्यांनी 2019 ते 2024 पर्यंत कूचबिहारमधून लोकसभेचे खासदार म्हणून काम केले. ते पश्चिम बंगाल विधानसभेचे सदस्यही राहिले आहेत. त्यांनी 2021 मध्ये दिनहाटा आणि 2026 मध्ये माथाभंगा येथून निवडणूक जिंकली. मार्च 2019 मध्ये भाजपमध्ये सामील होण्यापूर्वी, ते तृणमूल काँग्रेसचे सदस्य होते.
……………….
Comments are closed.