भाजप केरळमध्ये परिवर्तन घडवून आणेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वक्तव्य : 1987 ध्ये अहमदाबादनंतर गुजरात जिंकले, तसेच केरळमध्ये विजयी होऊ
वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम
केरळमध्ये भाजपच्या विजयाची नवी आशा दिसून येत असून येथील भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून आता राज्यात परिवर्तन होणारच असा विश्वास वाटतोय. 1987 च्या पूर्वी गुजरातमध्ये भाजप फारसा यशस्वी ठरत नव्हता. आमच्या पक्षाबद्दल वृत्तपत्रात दोन ओळीही छापल्या जात नव्हत्या. 1987 मध्ये पहिल्यांदा अहमदाबाद पालिकेत आम्ही विजय मिळविला होता, तसेच आता भाजपने तिरुअनंतपुरम येथे विजय मिळविला असून येथूनच केरळमध्ये भाजपच्या विजयाचा पाया रचला गेला असल्याचे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिरुअनंतपुरम येथील सभेला संबोधित करताना काढले आहेत. केरळमध्ये एप्रिल-मेमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे.
एलडीएफ आणि यूडीएफच्या लोकांनी केरळला भ्रष्टाचार आणि कुशासनाच्या राजकारणात लोटले. एलडीएफ आणि यूडीएफचे झेंडे वेगळे आहेत, चिन्ह वेगळे आहे, परंतु राजकारण अन् अजेंडा एकच आहे. एलडीएफ आणि यूडीएफमधील साटंलोटं मोडून काढावे लागेल आणि परिवर्तन घडवून आणावे लागणार असल्याचे मोदींनी म्हटले आहे.
देशविरोधी विचारसरणीपासून सतर्क
काँग्रेसच्या मुस्लीम लीग अणि माओवादी विचारसरणीपासून लोकांना सतर्क रहावे लागेल. ही देशविरोधी विचारसरणी आता केरळला स्वत:च्या प्रयोगशाळेचे स्वरुप देऊ पाहत आहे. काँग्रेस येथे कट्टरवादाला प्रोत्साहन देत आहे. तर श्रद्धेच्या या पवित्र भूमीला मुस्लीम लीगच्या अजेंड्यापासून वाचवावे लागणार आहे. 2014 पूर्वी दिल्लीत 10 वर्षांपर्यंत डाव्यांच्या समर्थनाने काँग्रेसचे सरकार चालत होते. त्या दरम्यान केरळच्या शेतकऱ्यांसाठी डाव्यांनी तसेच काँग्रेसने काहीच केले नाही. शेतकऱ्यांच्या कल्याणाचा पैसा नेत्यांच्या खिशात जात होता. आम्ही पीएम किसान निधी सुरू केला, एलडीएफ, यूडीएफचे लोक या पैशांची लूट करू शकत नसल्याचा दावा मोदींनी केला आहे.
तिरुअनंतपुरम पूर्ण देशासाठी आदर्श शहर
तिरुअनंतपुरम शहरावर दशकांपासून डाव्यांनी मोठा अन्याय केला आहे. येथील जनतेला मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवण्यात आले. आता असे होणार नाही. आमच्या टीमने विकसित केरळवर काम करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत जे बदलले नाही, ते आता बदलेल असे मी येथील जनतेला सांगू इच्छितो. तिरुअनंतपुरम पूर्ण देशासाठी आदर्श शहर ठरेल. भ्रष्टाचारामुळे केरळच्या विकासाला ब्रेक लागला आहे. बँकांमध्ये घोटाळे करून गरिबांचा पैसा लुटण्यात आला आहे. काँग्रेस आणि डाव्यांना लूटप्रकरणी कठोर शिक्षा मिळवून देणे आवश्यक आहे. भाजपला जनतेने संधी दिल्यास लूटलेला प्रत्येक पैसा त्यांच्याकडून वसूल केला जाणार असल्याचे आश्वासन मोदींनी सभेत दिले.
केरळचा विकास घडवू
केरळला विकसित करण्यात आमच्या युवाशक्तीची भूमिका आहे. काँग्रेस अन् डाव्यांनी युवांसोबत विश्वासघात केला आहे. तर सध्या पूर्ण जग आत्मनिर्भर भारत अभियानात स्वत:साठी संधी पाहत आहे. याचमुळे आखाती देश, युरोप भारतासोबत करार करत आहेत. याचा लाभा केरळला मिळू शकतो, याकरता येथे भाजपचे डबल इंजिन सरकार असणे आवश्यक आहे. विकसित केरळसाठी आता मोठे निर्णय घेण्याची वेळ आली आहे. केरळला नवे राजकारण हवे असल्याचे प्रतिपादन मोदींनी केले आहे.
शबरीमला मंदिराचा उल्लेख
भगवान अयप्पाच्या मंदिरावर पूर्ण देशातील लोकांची श्रद्धा आहे. परंतु डाव्यांच्या सरकारने शबरीमला मंदिराला नुकसान पोहोचविले आहे. या मंदिरातील सोन्याची चोरी करण्यात आली आहे. राज्यात भाजप सत्तेवर येताच चोरी प्रकरणाची चौकशी करत दोषींना तुरुंगात डांबण्यात येईल, ही मोदीची गॅरंटी असल्याचे उद्गा पंतप्रधानांनी काढले आहेत.
Comments are closed.