'त्या' विमानाचा ब्लॅक बॉक्स देखील खराब झाला आहे.
डीकोड करण्यासाठी अमेरिकेत पाठविण्याचा निर्णय
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
अहमदाबाद येथे दुर्घटनाग्रस्त झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचा ब्लॅकबॉक्सही हानीग्रस्त झाला आहे. विमान वरुन इमारतीवर कोसळल्याने त्या प्रचंड धक्क्याने ब्लॅकबॉक्सचीही हानी झाली आहे. हा ब्लॅकबॉक्स या इमारतीवरच सापडला होता. त्यात संकलित झालेली माहिती मिळविण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणेची आवश्यकता असून त्यामुळे तो डीकोडींगसाठी अमेरिकेला पाठविण्याचा निर्णय झाला आहे. या ब्लॅकबॉक्सच्या बाह्या आवरणाची मोठी हानी झाली आहे. तथापि, आतील भागातील माहिती सुरक्षित असण्याची शक्यता आहे. तथापि, ती मिळविण्यासाठी बॉक्सवर आधुनिक प्रक्रिया करण्याची आवश्यकता आहे. हे तंत्रज्ञान अमेरिकेकडे असल्याने तो तेथे पाठविला जाणार आहे. परिणामी, त्यातील माहिती प्राप्त होण्यास काहीसा विलंब लागण्याची शक्यता आहे, अशी माहिती देण्यात आली.
भारताकडे नाही तंत्रज्ञान
बाह्या आवरण तुटलेल्या किंवा जळलेल्या ब्लॅकबॉक्समधील माहिती बाहेर काढण्यासाठी आवश्यक असणारे तंत्रज्ञान भारतापाशी सध्या नाही. परिणामी, त्यासाठी विदेशी तंत्रज्ञानाचा आधार घ्यावा लागणार आहे. अमेरिकेने आपले तंत्रज्ञान उपयोगात आणण्यास मान्यता दिली असल्याने तो अमेरिकेला पाठविण्यात येईल. वॉशिंग्टन येथे अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा वाहतूक मंडळाची प्रयोगशाळा आहे. या प्रयोगशाळेत तो पाठविला जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
काही महिन्यांचा विलंब शक्य
हानीग्रस्त ब्लॅकबॉक्समधील माहिती बाहेर काढण्यासाठी काही दिवस ते काही महिन्यांचा कालावधी लागू शकतो. किती कालावधी लागणार, हे किती प्रमाणात हानी झाली आहे, त्यावर अवलंबून आहे. ही प्रक्रिया संपल्यानंतर या ब्लॅकबॉक्समधील माहिती सरकारच्या स्वाधीन करण्यात येईल, अशी शक्यता आहे.
घातपाताचीही शक्यता गृहित धरणार
गेल्या आठवड्यात झालेल्या या विमान दुर्घटनेत केवळ एक प्रवासी सुदैवाने वाचला होता. तथापि, विमानातील आणि भूमीवरील असे मिळून 274 जणांचा मृत्यू झाला होता. दुर्घटना कशी घडली, याची चौकशी केली जात आहे. केवळ अपघात नव्हे, तर घातपाताची शक्यताही गृहित धरून तपास केला जात आहे. विमानाची तांत्रिक बाजू सांभाळणाऱ्या तंत्रज्ञांची चौकशी करण्यात आली आहे. या चौकशीतून काय बाहेर आले, हे उघड करण्यात आलेले नाही. मात्र, परिस्थिती पाहता सर्व शक्यता समजून घ्याव्या लागणार आहेत, असे स्पष्ट केले गेले आहे.
Comments are closed.