कार स्फोट म्हणजे दहशतवादी हल्ला!

केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीनंतर सरकारची माहिती

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी संध्याकाळी सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीची (सीसीएस) बैठक घेत दिल्लीतील स्फोटाची घटना आणि त्यानंतर सुरू असलेल्या तपासाबाबत चर्चा केली. तसेच केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीतही याबाबत चर्चा केल्यानंतर सोमवार, 10 नोव्हेंबर रोजी झालेला कारस्फोट हा दहशतवादी हल्लाच असल्याची घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय व चर्चेची माहिती माध्यमांना दिली.

पंतप्रधानांच्या मुख्य उपस्थितीत बुधवारी झालेल्या ‘सीसीएस’ बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि एनएसए अजित डोवाल हे उपस्थित होते. दिल्ली लालकिल्ला स्फोटानंतर मोदींनी ही बैठक बोलावली. ‘ऑपरेशन सिंदूर’पूर्वी मोदींनी सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीची बैठकही घेतली होती. याप्रसंगी दिल्ली लाल किल्ला स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि दोन मिनिटे मौन पाळण्यात आले. पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मोदींनी सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीची (सीसीएस) बैठकही घेतली होती.

बुधवारी सकाळी पंतप्रधान मोदी भूतान दौऱ्यावरून परतल्यानंतर विमानतळावरून थेट एलएनजेपी रुग्णालयात गेले. त्यांनी लाल किल्ला स्फोटातील पीडितांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच दिल्ली स्फोटानंतर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत पंतप्रधानांनी ‘कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी’ म्हणजेच ‘सीसीएस’ची महत्त्वाची बैठक बोलावली होती. लाल किल्ल्यावरील कार बॉम्बस्फोटाची चौकशी वेगाने सुरू असतानाच या बैठकीत आतापर्यंतचा तपास अहवाल, सुरक्षा संस्थांकडून मिळालेले माहिती आणि भविष्यातील रणनीती यावर चर्चा करण्यात आली.

दहशतवादी हल्ल्यासंबंधी ठराव मंजूर

केंद्रीय मंत्रिमंडळाने लाल किल्ल्याजवळ झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत एक ठराव मंजूर केला. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ठराव वाचून दाखवला. मंत्रिमंडळाने या दहशतवादी घटनेचे वर्णन ‘देशविरोधी शक्तींनी केलेले घृणास्पद कृत्य’ असे केले आहे. तसेच तपास यंत्रणांना कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दहशतवादाविरुद्ध सरकारचे शून्य सहनशीलतेचे धोरण असल्याची माहितीही वैष्णव यांनी याप्रसंगी दिली.

जम्मू-काश्मीरमध्ये अलर्ट जारी

दिल्ली बॉम्बस्फोटानंतर जम्मू काश्मीरमधील सर्व प्रमुख प्रतिष्ठानांवर सुरक्षा कडक करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय सीमा आणि लगतच्या भागातही अलर्ट जारी करण्यात आला आहे. बीएसएफ आणि जम्मू काश्मीर पोलिसांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जम्मू विभागाचे पोलीस महानिरीक्षक भीमसेन तुती बुधवारी संध्याकाळी उशिरा कठुआच्या हिरानगर सेक्टरमधील आंतरराष्ट्रीय सीमेचा आढावा घेण्यासाठी पोहोचले होते. यादरम्यान त्यांनी अनेक सीमा पोलीस चौक्यांची पाहणी करत सुरक्षा कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. सीमापार घुसखोरीचा धोका लक्षात घेता सुरक्षा यंत्रणा कोणत्याही चुका होऊ नयेत यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

आता ‘ऑपरेशन सिंदूर-2’ची चर्चा

दिल्लीतील कारबॉम्बस्फोट प्रकरणाच्या तपासात लष्कर-ए-तोयबा किंवा जैश-ए-मोहम्मदचा सहभाग असल्याचे सिद्ध झाले तर भारत पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर प्रत्युत्तर देऊ शकतो. सरकारने यापूर्वीच देशात होणारा कोणताही दहशतवादी हल्ला आता युद्धाचा गुन्हा मानला जाईल, असे जाहीर केले आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर जैश आणि लष्कर-ए-तोयबाचे अनेक तळ पाकिस्तानात हलवण्यात आल्याचे वृत्त आहे. ते भारतीय सीमेपासून सुमारे 350 किलोमीटर अंतरावर असलेल्या खैबर पख्तूनख्वा प्रदेशात हलवण्यात आले. मात्र, भारतीय हवाई दल प्रमुखांनी अलीकडेच पाकिस्तानातील कोणताही दहशतवादी तळ आमच्या आवाक्याबाहेर नसल्याचा इशारा देत पाकिस्तानला सूचक संदेश दिला होता. त्यामुळे आता दिल्लीतील स्फोटानंतर ‘ऑपरेशन सिंदूर-2’ चालू होणार का? अशी चर्चा सध्या जोरदार सुरू आहे.

…………….

 

Comments are closed.