हिंदुस्थानी हॉकीचा शतक महोत्सव जोरदार होणार, हॉकी इंडियाकडून छप्पर फाडके अनुदानाची घोषणा

हिंदुस्थानी हॉकीच्या शतकपूर्तीच्या पार्श्वभूमीवर हॉकी इंडियाने आज आपल्या 15 व्या वार्षिक सभेत राष्ट्रीय व स्थानिक स्तरावरील स्पर्धांसाठी अनुदान वाढीची छप्पर फाडके घोषणा केली. हॉकीच्या शंभरीचा उत्सव साजरा करण्यासाठी देशभरात हॉकीचा प्रसार, खेळाचा दर्जा उंचावणे आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करण्याचे ध्येय समोर ठेवत अनुदान वाढीचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिर्की यांनी दिली.

हॉकी इंडियाने दिलेल्या माहितीनुसार पुरुष आणि महिलांच्या राष्ट्रीय स्पर्धा आयोजनासाठी प्रत्येकी 70 लाखांचे अनुदान दिले जाणार आहे. तसेच ज्युनियर गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी 30 लाखांचे अनुदान पुरवले जाईल. तसेच सब ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धांसाठीही 30 लाखांचे अनुदान लाभेल. एवढेच नव्हे तर जिल्हा आणि राज्य स्पर्धांसाठीही 25 लाखांचे अनुदान देत हॉकीचा दर्जा आणि पायाभूत सुविधा उंचावण्याचे ध्येय हॉकी इंडियाने हिंदुस्थानी हॉकीच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त समोर ठेवले आहे.  7 नोव्हेंबरला हिंदुस्थानी हॉकीला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत आणि त्यादिवशी पूर्ण हिंदुस्थानात हॉकीचा उत्सव साजरा व्हावा म्हणून एक हजार सामन्यांचे महाआयोजन करण्याचे ध्येय हॉकी इंडियाने समोर ठेवले. या महाआयोजनात हिंदुस्थानातील तब्बल 36 हजारांपेक्षा अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत. या महोत्सवाच्या निमित्ताने हिंदुस्थानी हॉकीची परंपरा जपताना भावी पिढय़ांसाठी हॉकीचा पाया मजबूत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे अनुदान हॉकीच्या नव्या स्वप्नांमध्ये केलेली एक गुंतवणूक असल्याचेही तिर्की यांनी दिली.

Comments are closed.