सामान्य माणसाला त्रास होऊ नये.

पंतप्रधान मोदी यांची प्रशासनाला स्पष्ट सूचना

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

मध्यपूर्वेत युद्ध भडकले असले, तरी त्याची झळ देशातील सर्वसामान्य नागरीकांना पोहचता कामा नये, अशा प्रकारे प्रशासनाने व्यवस्था करावी, अशी स्पष्ट सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. त्यांनी आज तेल परिस्थितीसंदर्भात मंत्री आणि अधिकारी यांची बैठक आयोजित केली. या बैठकीत त्यांनी प्रशासनाच्या सर्व विभागांना महत्वाच्या सूचना केल्या. सर्वसामान्यांना केंद्रस्थानी ठेवून सर्व व्यवस्था केली जावी, असे प्रतिपादन त्यांनी बैठकीत केले.

सध्याची परिस्थिती आव्हानात्मक आहे. तरीही स्वयंपाकाचा गॅस, इंधन तेल आदी वस्तूंची देशात टंचाई नाही. सध्याच्या परिस्थितीत देशात जीवनावश्यक वस्तूंची कमतरता नाही. त्यामुळे प्रशासनाने सर्वसामान्यांच्या खिशावर भार पडणार नाही, अशा प्रकारे पुरवठ्याची व्यवस्था केली पाहिजे. आम्ही कच्चे इंधन तेल आणि स्वयंपाकाचा गॅस यांच्या पुरवठ्यासंदर्भातील धोरणात अमूलाग्र परिवर्तन केले आहे. आम्ही विविध देशांकडून या दोन वस्तू आयात करत आहोत. परिस्थिती कशीही असली तरी देशात टंचाई निर्माण होता कामा नये. तसेच सर्वसामान्यांपर्यंत सर्व जीवनावश्यक वस्तू, विशेषत: इंधन विनासायास पोहचले पाहिजे, ही केंद्र सरकारची भूमिका आहे. प्रशासनाने त्या दिशेने सर्व व्यवस्था सज्ज ठेवावी. सर्वसामान्यांकडून तक्रार येणार नाही, हे पहावे, असे स्पष्ट दिशानिर्देश त्यांनी दिले.

गॅसला सर्वाधिक प्राधान्य

स्वयंपाकाचा गॅस, तसेच व्यापारी उपयोगाचा गॅस यांना केंद्र सरकार सर्वाधिक प्राधान्य देत आहे. रेस्टॉरंट संघटनेशी थेट संवाद करण्याची सूचना तेल कंपन्यांना करण्यात आली आहे. त्यांच्यात संवाद प्रस्थापित व्हावा, यासाठी एक उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती गॅसच्या पुरवठ्यावर लक्ष ठेवणार आहे. भारताने गॅसच्या देशांतर्गत उत्पादनात वाढ केलेली आहे. तसेच, तेल आणि गॅस भारतापर्यंत पोहचण्यासाठी पर्यायी समुद्री मार्गांचा शोधही घेतला आहे. त्यामुळे अनेक देशांकडून आम्हाला येत्या दोन-तीन दिवसांमध्येच तेल आणि गॅसचा पुरवठा होण्यास प्रारंभ होणार आहे. भारत 40 देशांच्या संपर्कात असून त्यांच्याकडून इंधनाची खरेदी करण्याची व्यापक योजना साकारत आहे. त्यामुळे कोणीही घाबरुन जाण्याचे कारण नाही, असे प्रतिपादन त्यांनी मंगळवारी केले.

भारताची स्थिती तुलनेने सुकर

युद्धामुळे तेल पुरवठ्याच्या साखळ्या तुटल्याने अनेक देशांना मोठ्याच संकटाला तोंड द्यावे लागत आहे. तथापि, भारताने आधीपासूनच तेल आयातीसाठी अनेक पर्याय सज्ज ठेवल्याने भारताची स्थिती अन्य देशांपेक्षा तुलनेने खूपच सुखावह आहे. भारतात सध्या तेलाचा तुटवडा नाही. तसेच गॅसही पुरेशा प्रमाणात आहे. लोकांनी अफवांवर विश्वास न ठेवता संयम राखावा, असे आवाहन केले गेले आहे.

सरकारची रणनीती काय आहे…

ड सार्वजनिक तेल कंपन्या समिती स्थापन करुन रेस्टॉरंट संघटनेशी थेट संपर्क साधणार. रेस्टॉरंटस्ना गॅसचा आवश्यक पुरवठा करण्याचा प्रयत्न केला जाणार

ड सार्वजनिक तेल कंपन्यांना गॅस उत्पादन वाढविण्याचा आदेश दिला गेला आहे. त्यांनी उत्पादनात किमान 10 टक्के वाढ केल्याने टंचाईची स्थिती नाही

ड होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्याने भारताने अन्य समुद्री मार्गाने तेल मिळविण्याची व्यवस्था केली असल्याने ते तेल देशात येण्यास प्रारंभ झाला आहे

ड देशातील सर्व तेलशुद्धीकरण केंद्रांना पूर्ण क्षमतेने कार्य करण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे टंचाई निर्माण होऊ नये, अशी व्यवस्था केली आहे

ड अनेक देशांशी व्यवहार केला आहे. त्यामुळे देशात लवकरच मोठ्या प्रमाणात गॅस आणि तेलाची आयात होण्यास प्रारंभ होत असल्याने टंचाई होणार नाही

Comments are closed.