केरळमध्ये काँग्रेस आघाडीचा विजय झाला आहे.

भाजपने जिंकली थिरुवनंतपुरम महानगरपालिका, स्थानिक निवडणुकांमध्ये डाव्या आघाडीला अपयश

वृत्तसंस्था / थिरूवनंतपुरम

केरळमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस आघाडीची सरशी झाली आहे. तथापि, केरळची राजधानी असलेल्या थिरुवनंतपुरमच्या महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने इतिहासात प्रथमच आपला ध्वज फडकविला आहे. या राज्यात येत्या पाच महिन्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार असल्याने निवडणुकीच्या आधी झालेल्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महत्वाच्या मानल्या जात आहेत.

केरळमध्ये 9 आणि 10 डिसेंबरला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदान झाले होते. एकंदर, जवळपास 75 टक्के मतदारांनी त्यांच्या मतदानाचा अधिकाराचा उपयोग केला होता. या निवडणुकांची मतगणना शनिवारी करण्यात आली. एकंदर परिणामांचा विचार करता सध्या राज्यात सत्तेवर असलेल्या डाव्या आघाडीला मोठा फटका बसल्याचे दिसून येत आहे. तसेच काँग्रेसप्रणित युनायटेड डेमॉव्रेटिक फ्रंटला (युडीएफ) मोठे यश मिळालेले आहे. ग्रामपंचायत, नगरपालिका, विभागपालिका, जिल्हा परिषद आणि महानगरपालिका अशा सर्व निवडणुकांमध्ये युडीएफ आघाडीवर आहे. दुसऱ्या क्रमांकावर डावी आघाडी असून राष्ट्रीय लोकशाही आघाडीला दूरचा तिसरा क्रमांक मिळाल्याचे स्पष्ट होत आहे.

थिरुवनंतपुरमचा परिणाम चर्चेत

या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सर्वाधिक चर्चा राजधानी थिरुवनंतपुरमची होत आहे. या महानगरपालिकेत इतिहासात प्रथमच भारतीय जनता पक्षाने आणि त्याच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने मोठे यश प्राप्त केले आहे. त्यामुळे या महानगरात प्रथमच भारतीय जनता पक्षाचा महापौर येण्याची शक्यता आहे. एकंदर 101 प्रभागांपैकी राष्ट्रीय लोकशाही आघाडी 50 प्रभागांमध्ये विजयी झाली आहे. डाव्या आघाडीला 29 तर काँग्रेस आघाडीला 19 जागा मिळाल्या आहेत. 2 जागांवर अपक्ष निवडून आले आहेत. तर एका जागेवरची निवडणूक उमेदवाराच्या निधनामुळे रद्द करण्यात आली आहे. अशा प्रकारे राष्ट्रीय लोकशाही आघाडीने 100 पैकी 50 प्रभागांमध्ये विजय मिळविल्याने भारतीय जनता पक्षाचा महापौर होणे शक्य आहे. 2020 च्या महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 35 जागांवर विजय मिळाला होता.

पंतप्रधान मोदी यांनी केले अभिनंदन

केरळच्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीने आतापर्यंतचे सर्वात मोठे यश मिळविल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आघाडीचे अभिनंदन केले आहे, तर जनतेचे आभार मानले आहेत. थिरुवनंतपुरम्चा विजय ही ऐतिहासिक महत्वाची घटना असून मी या विजयासाठी सर्व कार्यकर्ते आणि नेते यांचे अभिनंदन करीत आहे, असा संदेश त्यांनी दिला.

45 वर्षांचा एकाधिकार समाप्त

थिरुवनंतपुरम् महानगरपालिका गेली 45 वर्षे सलग डाव्या आघाडीच्या हाती होती. त्यापूर्वी तेथे काँग्रेस आघाडीची सरशी होत असे. मात्र, या निवडणुकीत प्रथमच या महानगरपालिकेत भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीला निर्णायक यश मिळाल्याने तो सर्वाधिक चर्चेचा विषय झाला आहे. थिरुवनंतपुरमचे काँग्रेसचे लोकसभा सदस्य थरुर यांनीही रालोआचही अभिनंदन केले आहे.

काँग्रेस आघाडीला प्रचंड यश

थिरुवनंतपुरम वगळता इतरत्र अनेक स्थानी काँग्रेसप्रणित आघाडीला मोठा विजय मिळाला आहे. या आघाडीने सहापैकी चार महानगरपालिकांमध्ये बहुमत मिळवले. या महानगरपालिका यापूर्वी डाव्या आघाडीच्या हाती होत्या. केवळ कोझीकोडे महानगरपालिकेत डावी आघाडी सर्वात मोठी ठरली आहे. तथापि, येथेही भारतीय जनता पक्षाने 13 प्रभाग जिंकून डाव्या आघाडीला स्पष्ट बहुमतापासून रोखले आहे. या निवडणुकांचे परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीच्या परिणामांची दिशा दर्शवत आहेत, असे मत अनेक राजकीय तज्ञांनी व्यक्त केले आहे.

 

‘वक्फ’चा परिणाम

या निवडणुकांमध्ये मुनांबम येथील परिणामही चर्चेचा विषय ठरला आहे. येथे ख्रिश्चन समाजाच्या 410 घरांवर मुस्लीमांनी वक्फची मालमत्ता असल्याचा दावा करत या ख्रिश्चन कुटुंबांनी घरे सोडवीत अशी मागणी केली आहे हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. येथे खिश्चन समाजाच्या मतांची संख्या लक्षणीय असून भारतीय जनता पक्षाला विजय मिळाला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत हा समाज भारतीय जनता पक्षाकडे येईल का, अशी चर्चा होत आहे.

Comments are closed.