काँग्रेस पक्ष बांगलादेशी घुसखोरांना पाठिंबा देत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल : आसाम दौऱ्यावेळी दिब्रुगडमध्ये युरिया खत प्रकल्पाचे भूमिपूजन

वृत्तसंस्था/ गुवाहाटी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आसाममधील नामरूपमध्ये नवीन अमोनिया-युरिया खत प्रकल्पाच्या भूमिपूजन समारंभानंतर काँग्रेसवर तीव्र हल्लाबोल केला. एका जाहीर सभेला संबोधित करताना त्यांनी काँग्रेसने नेहमीच आसाम आणि ईशान्येच्या विकासाला विरोध केल्याचा आरोप केला. तसेच बांगलादेशी घुसखोरांना पाठबळ दिल्यामुळे आज ही समस्या मोठी डोकेदुखी ठरत असल्याचा दावाही पंतप्रधान मोदींनी केला.

पंतप्रधानांनी काँग्रेसवर बेकायदेशीर घुसखोरांना पाठिंबा देऊन आसामच्या लोकसंख्येचे नुकसान केल्याचा आरोप केला. भाजप सरकारने जेव्हा महान आसामी कलाकार भूपेन हजारिका यांना भारतरत्न देऊन सन्मानित केले तेव्हा काँग्रेसने त्यांचा अपमान केला असे पंतप्रधान म्हणाले. आसाममधील नागाव जिह्यात सेमीकंडक्टर उत्पादन युनिट स्थापन करण्याच्या निर्णयाला काँग्रेसने विरोध केल्याचा आरोपही त्यांनी केला. खत प्रकल्पाच्या भूमिपूजनापूर्वी पंतप्रधान मोदींनी गुवाहाटीतील पश्चिम बोरागाव येथील स्वाहिद स्मारक क्षेत्रात आसाम चळवळीतील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. सहा वर्षांच्या चळवळीतील पहिले हुतात्मा खर्गेश्वर तालुकदार यांच्या पुतळ्याला त्यांनी पुष्पचक्र अर्पण केले.

काँग्रेसला आसामी लोकांबद्दल प्रेम नाही

पंतप्रधान मोदी म्हणाले की काँग्रेसला आसामच्या लोकांबद्दल प्रेम नाही, उलट बेकायदेशीर घुसखोरांकडे त्यांचा कल आहे. आसामच्या लोकसंख्याशास्त्राचे नुकसान करणाऱ्या घुसखोरांना काँग्रेसने पाठिंबा दिला कारण ते त्यांची मतपेढी आहेत. भाजपने नेहमीच आसामच्या लोकांच्या हक्कांचे रक्षण केले आहे. पूर्वी शेतकऱ्यांना खतासाठी लाठीमार झेलावा लागत होता. काँग्रेसने त्यावेळी जे काम करायला हवे होते ते केले नाही. म्हणूनच मला जास्त मेहनत करावी लागत असल्याचे मोदी म्हणाले.

देशविरोधी विचारसरणींना काँग्रेसचे प्रोत्साहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, काँग्रेस पक्ष अजूनही देशविरोधी विचारसरणींना प्रोत्साहन देत आहे. हे लोक बांगलादेशी घुसखोरांना आसामच्या जंगलात आणि जमिनीत बसवून त्यांची मतपेढी मजबूत करू इच्छितात. येथील स्थानिकांचे काय होईल याची त्यांना पर्वा नाही. काँग्रेस पक्षाला आसाम, तेथील लोकांची किंवा तुमच्या ओळखीची काहीही तमा नाही. त्यांना फक्त सत्ता, सरकार आणि जुन्या परंपरा चालू ठेवण्यात रस आहे. म्हणूनच ते बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरांना प्राधान्य देतात. त्यातूनच सध्या काँग्रेस पक्ष ‘एसआयआर’ला विरोध करत आहे. काँग्रेसच्या तुष्टीकरण आणि मतपेढीच्या राजकारणाच्या या विषारी धोरणापासून आपण आसामला वाचवले पाहिजे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. भाजप आसामची ओळख आणि सन्मान जपण्यासाठी येथील जनतेच्या पाठीशी खडकासारखा उभा असल्याचेही ते पुढे म्हणाले.

10,600 कोटी रुपयांचा खत प्रकल्प

पंतप्रधान मोदी यांनी नामरूपमधील ब्रह्मपुत्र व्हॅली फर्टिलायझर कॉर्पोरेशन लिमिटेड (बीव्हीएफसीएल) संकुलात 10,600 कोटी रुपयांच्या अमोनिया-युरिया खत प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ केला. आसाम आणि संपूर्ण ईशान्येसाठी हा एक महत्त्वाचा दिवस असल्याचे वर्णन त्यांनी याप्रसंगी केले. या प्रदेशात औद्योगिक प्रगतीचा एक नवीन अध्याय सुरू होत आहे. नामरूप आणि दिब्रुगडचे बहुप्रतिक्षित स्वप्न आज पूर्ण होत आहे. आसामने विकासाची नवी गती सुरू केली असून ही फक्त सुरुवात असल्याचे सुतोवाचही पंतप्रधानांनी केले.

नवीन युनिट पाच वर्षांत तयार होणार

बीव्हीएफसीएल हा ईशान्येकडील सर्वात जुना खत प्रकल्प आहे. आता त्याची क्षमता वाढवण्यासाठी चौथे युनिट स्थापन केले जात आहे. हे युनिट पाच वर्षांत तयार होईल आणि त्याची उत्पादन क्षमता दरवर्षी 12.5 लाख मेट्रिक टन असेल, असे केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी सांगितले. या विस्तारामुळे ईशान्येकडील शेतकऱ्यांच्या खतांच्या गरजा पूर्ण होतीलच, शिवाय भूतान आणि म्यानमारसारख्या शेजारील देशांमध्ये निर्यातीच्या संधीही उपलब्ध होतील. या क्षमता वाढीचा फायदा पश्चिम बंगाल आणि बिहारलाही होईल, असेही ते पुढे म्हणाले.

Comments are closed.