देश सुरक्षित हातात आहे!

सोनिया गांधींच्या विश्वासू सहकाऱ्याच्या पुत्राकडून मोदींचे कौतुक

वृत्तसंस्था/अहमदाबाद

काँग्रेसचे दिग्गज नेते दिवंगत अहमद पटेल यांचे पुत्र फैसल पटेल यांनी नरेंद्र मोदी सरकारचे कौतुक करत देश सुरक्षित हातांमध्ये असल्याचे म्हटले आहे. मी काँग्रेसवर नाराज नाही, केवळ सार्वजनिक जीवनातून ब्रेक घेत असल्याचे फैसल यांनी सांगितले आहे. फैसल यांचे पिता अहमद पटेल काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार होते आणि त्यांना पक्षातील सर्वात मोठे संकटमोचक म्हणून ओळखले जात होते. 44 वर्षीय फैसल यांनी काही महिन्यांपूर्वी काँग्रेससाठी काम करणे बंद करत असल्याची घोषणा केली होती. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत चालण्याची संधी काँग्रेसने दिली नसल्याचे त्यांनी म्हटले होते.

आमचा देश आमच्या सैन्यामुळे सुरक्षित हातांमध्ये आहे. नरेंद्र मोदी, डॉ. एस. जयशंकर, अमित शाह, राजनाथ सिंह हे देश चालवत असून ते कठोर मेहनत करत आहेत. आमच्यासमोर महागाई, बेरोजगारी आणि अन्य समस्या आहेत, परंतु हे नेते चांगले काम करत आहेत असे वक्तव्य फैसल यांनी केले आहे. देशाला याहून चांगले नेतृत्व मिळू शकत नव्हते. पहलगाम हल्ल्यानंतर आमच्या सैन्याने केलेली कारवाई बेजोड आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तम नेतृत्व दाखवून दिले आणि देशाला मोठ्या संकटातून बाहेर काढले. मला माझ्या सैन्याबद्दल गर्व आहे. विदेशमंत्री जयशंकर यांचा मी अत्यंत आदर करतो, असे फैसल म्हणाले.

राहुल गांधी मेहनती नेते

फैसल यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचेही कौतुक केले आणि त्यांना मेहनती नेता संबोधिले. काँग्रेसमध्ये शशी थरूर, डी.के. शिवकुमार, रेवंत रेड्डी , दीपेंद्र हुड्डा आणि सचिन पायलट यासारखे हुशार अन् समजंस नेते आहेत. परंतु पक्षात काही समस्या देखील आहेत. वरिष्ठ नेत्याला योग्य सल्ला दिला जात नसल्याचे चित्र आहे. तसेच त्यांचे सल्लागार योग्यप्रकारे काम करत नाहीत असे फैसल यांनी म्हटले आहे.

Comments are closed.