आज देशाचे नवीन उपाध्यक्ष निवडले जातील.
सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान : 6 वाजल्यापासून मतमोजणी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
उपराष्ट्रपती पदासाठी आज, 9 सप्टेंबर रोजी निवडणूक होत आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर सायंकाळी 6 वाजल्यापासून मतमोजणीला प्रारंभ होईल. मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर विजयी उमेदवाराची घोषणा केली जाईल. या निवडणुकीत रालोआचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन आणि विरोधी पक्षाचे उमेदवार बी. सुदर्शन रे•ाr यांच्यात थेट लढत होत आहे. निवडणुकीपूर्वी सोमवारी मताधिकार प्राप्त असलेल्या खासदारांना मतदानाची प्रक्रिया समजावून सांगण्यात आली. मतदानाच्या दिवशी कोणतीही चूक होऊ नये म्हणून संसदेच्या संविधान सभागृहाच्या सेंट्रल हॉलमध्ये दुपारी 2.30 वाजता ‘मॉक पोल’ म्हणजेच सराव मतदान आयोजित करण्यात आले होते.
जगदीप धनखड यांनी 21 जुलैच्या रात्री अचानक राजीनामा दिल्याने उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होत आहे. धनखड यांच्या राजीनाम्यानंतर निवडणूक आयोगाने मागील महिन्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानंतर सत्ताधारी रालोआने महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची उमेदवार म्हणून निवड केली होती. तर, विरोधी पक्षातर्फे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. सुदर्शन रे•ाr यांना उमेदवारी दिली आहे. निवृत्त न्यायमूर्ती रे•ाr हे आंध्रप्रदेशचे आहेत, तर राधाकृष्णन हे तामिळनाडूचे रहिवासी आहेत. सद्यस्थितीत लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये सत्ताधारी पक्षाचे बहुमत असल्यामुळे रालोआचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
रिटर्निंग ऑफिसर कोन?
राज्यसभेचे सरचिटणीस पी. सी. मोदी हे या निवडणुकीचे रिटर्निंग ऑफिसर आहेत. त्यांनी या निवडणुकीसाठी मतदानाचा अधिकार असलेल्या दोन्ही सभागृहातील सर्व खासदारांना मतदान प्रक्रियेची माहिती दिली आहे. 9 सप्टेंबर रोजी संसद भवनातील खोली एफ-101 मध्ये सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होईल. मतदान संपल्यानंतर त्याचदिवशी सायंकाळी 6 वाजता मतमोजणी सुरू होईल आणि निकाल लगेच जाहीर केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
दोन्ही सभागृहांमधील खासदारांना मताधिकार
उपराष्ट्रपती निवडणुकीत संसदेच्या दोन्ही सभागृहातील सदस्य मतदान करू शकतात. राज्यसभेचे नामांकित सदस्य देखील मतदान करण्यास पात्र आहेत. दोन्ही सभागृहांमध्ये एकूण 788 सदस्य आहेत. परंतु सध्या काही जागा रिक्त असल्यामुळे 781 सदस्य मतदानात सहभागी होतील. सध्या राज्यसभेत 239 आणि लोकसभेत 542 खासदार आहेत. हे सर्व मतदान करण्यास पात्र आहेत. अशाप्रकारे, एकूण मतदारांची संख्या 781 असल्यामुळे बहुमताचा आकडा 391 आहे. रालोआकडे 425 खासदार आहेत. अशा परिस्थितीत संख्याबळाचा विचार करता सी. पी. राधाकृष्णन यांचा विजय निश्चित मानला जातो.
बीजेडी, बीआरएस मतदानापासून दूर राहणार
उपराष्ट्रपती निवडणुकीपासून दूर राहणार असल्याचे बीजेडीने स्पष्ट केले. दुसरीकडे, के. चंद्रशेखर राव यांचा बीआरएसदेखील उपराष्ट्रपती निवडणुकीपासून दूर राहण्याचे संकेत आहेत. या निवडणुकीत हे दोन्ही पक्ष सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही बाजूंच्या उमेदवारांपासून स्वत:ला दूर ठेवू शकतात असे मानले जाते. बीजेडी आणि बीआरएस यांच्या या हालचालीमुळे विरोधी गटाला मोठा धक्का बसू शकतो. साहजिकच उपराष्ट्रपती निवडणुकीत एनडीएचा विजय आधीच निश्चित मानला जात असताना आता त्यांचा मार्ग अधिक सुकर झाला आहे.
Comments are closed.