सौदी अरेबियात अडकलेल्या एखाद्याचे रडणे

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

सौदी अरेबियात कामासाठी गेलेल्या उत्तर प्रदेशातील एका कामगाराची ससेहोलपट सध्या कशी होत आहे, याचे दर्शन सोशल मिडियावरुन होत आहे. या व्यक्तीने आपला एक व्हिडीओ सोशल मिडियावर टाकला असून त्यात त्याने त्याच्यावरील अन्यायाला वाचा फोडली आहे. या व्यक्तीला मोठमोठी आश्वासने देऊन सौदी अरेबियात पाठविण्यात आले होते. तथापि, तेथे त्याची अवस्था गुलामासारखी करण्यात आली. त्याचा पासपोर्ट आणि व्हिसा त्याच्या मालकाने स्वत:च्या ताब्यात घेतला असून त्यामुळे हा कामगार त्याची इच्छा असूनही भारतात परत येऊ शकत नाही. व्हिसा आणि पासपोर्ट काढून घेण्याच्या या पद्धतीला ‘कफाला पद्धती’ असे संबोधन आहे. ही पद्धती कायद्याने बंद करण्याचा सौदी अरेबियाच्या प्रशासनाचा विचार आहे. कारण ही पद्धती आधुनिक काळातील गुलामगिरी पद्धतच आहे, असे टीकाकारांचे म्हणणे आहे. भारताच्या सरकारने या प्रकरणात लक्ष घालण्याचा निर्णय घेतला असून या व्यक्तीच्या सुटकेची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे, अशी माहिती परराष्ट्र व्यवहार विभागाने दिली आहे.

Comments are closed.