इंदूर दुर्घटनेतील मृतांची संख्या 15 वर पोहोचली आहे.

पाण्यात आढळले जंतू, विरोधकांची जोरदार टीका

वृत्तसंस्था/ इंदूर (मध्यप्रदेश)

मध्यप्रदेशातील इतिहासप्रसिद्ध इंदूर शहरातील प्रदूषित पाणी दुर्घटनेतील मृतांची संख्या 15 वर पोहचली आहे. पिण्याचे पाणी वाहून नेणाऱ्या पाईपलाईनमध्ये मैलामिश्रित पाणी मिसळल्याने ही दुर्घटना गुरुवारी घडली. या दुर्घटनेत 400 हून अधिक लोक आजारी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या दुर्घटनेच्या चौकशीचा आदेश दिला आहे.

हे दूषित पाणी प्यायल्याने इंदूरच्या काही भागात अतिसाराचा उद्रेक झाला आहे. दूषित पाण्याची तपासणी करण्यात आली असून पाण्यात अतिसाराच्या जंतूंचे प्रमाण मोठे असल्याचे आढळले आहे. राज्य सरकारने युद्ध पातळीवर स्थिती नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यास गुरुवारपासूनच प्रारंभ केला होता. प्रदूषित पाण्याचा स्रोत आता बंद करण्यात यश आले असून संपूर्ण शहराचा स्वच्छ पाण्याचा पुरवठा पूर्ववत झाला आहे, अशी माहिती शहर प्रशासनाने दिली आहे.

उच्च न्यायालयात सुनावणी

गुरुवारीच मध्यप्रदेशच्या उच्च न्यायालयात या दुर्घटनेसंबंधी याचिका सादर करण्यात आली आहे. न्यायालयाने मध्यप्रदेश सरकारवर ताशेरे ओढताना या दुर्घटनेचा पूर्ण अहवाल सादर करण्याचा आदेश दिला होता. शुक्रवारी इंदूर महानगरपालिकेने हा अहवाल न्यायालयाला सादर केला. सर्वांना सच्छ पाणी मिळेल अशी व्यवस्था त्वरित करा, असा आदेश उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला आहे.

पाण्याची व्यापक तपासणी

इंदूर शहरातून विविध स्थानी पिण्याच्या पाण्याचे नमुने संकलित करण्यात आले असून त्यांची तपासणी करण्यात आली. काही भागांमधील पाण्यात अतिसाराचे जंतू आढळून आल्याने अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. पाण्याच्या तपासणीचा सविस्तर अहवाल सज्ज करण्यात आला असून तो राज्य सरकारला सादर करण्यात येत आहे, अशी माहिती या शहराचे मुख्य वैद्यकीय आणि आरोग्य अधिकारी डॉ. माधवप्रसाद हसानी यांनी पत्रकारांशी बोलताना शुक्रवारी दिली आहे.

पाण्यावर प्रक्रियेला प्रारंभ

दूषित पाणी शहरातील ज्या टाक्यांमध्ये साठले आहे, त्या स्वच्छ करण्यात येत आहेत. तसेच सर्वच पाण्यावर योग्य ती प्रक्रिया करण्यात येत आहे. अतिसाराची वृत्ते प्रथम ज्या भगिरथपुरा वस्तीमधून उघड झाली होती. त्या वस्तीतील पाण्याच्या टाक्या रिकाम्या करण्यात आल्या असून स्वच्छ पाण्याचा पुरवठा केला जात आहे. साठलेले पाणी शुद्ध करण्याच्या प्रक्रियेला किमान आठ ते दहा दिवस लागतील, अशी शक्यता आहे. तो पर्यंत अन्य स्रोतांमधून स्वच्छ पाणी पुरविले जात आहे.

मृतांच्या संख्येविषयी विवाद

मध्यप्रदेश राज्याच्या नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय दुबे यांनी मृतांच्या संख्येविषयी सविस्तर माहिती दिली. अनधिकृत वृत्तानुसार आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला आहे. पण मृतदेहांची उत्तरीय तपासणी केल्यानंतर केवळ चार मृत्यू दूषित पाण्याने झाल्याचे आढळले आहे. आतापर्यंत केवळ 9 मृत्यूंना दुजोरा देण्यात आला असून काही मृत्यू अन्य कारणांनी झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मृतांच्या संख्येसंबंधी गुरुवारपासूनच वाद होत होता. तथापि, गेल्या दोन दिवसांमध्ये शहरात झालेले सर्व मृत्यू या घटनेशी जोडले जाऊ शकत नाहीत. अन्य कारणांनीही ते झाले आहेत, अशी माहिती काही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली.

पाईपलाईनमध्ये लीकेज

शहराच्या एका बाह्या पोलीस चौकीनजीक पाईपलाईनमध्ये लीकेज आढळले आहे. या लीकेजमुळेच ड्रनेजचे मैलामिश्रित पाणी पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये मिसळल्याचा संशय आहे. सध्या हे लीकेज काढण्यात आले असून पाईपलाईनची दुरुस्ती केली जात आहे, असे प्रशासकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

विरोधकांकडून सरकार धारेवर

या दुर्घटनेला मध्यप्रदेशचे आणि इंदूर महापालिकेचे प्रशासन उत्तरदायी आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप केला. प्रशासनाला सामान्यांच्या जीवाची कोणतीही किंमत उरलेली नसून नेते केवळ सत्ता सांभाळण्यात गुंतले असल्याची टीका त्यांनी केली.

Comments are closed.