चेंगराचेंगरीतील मृत्यूची संख्या 40 वर गेली आहे.
मृतांमध्ये 16 महिलांसह 10 मुलांचा समावेश : 51 जणांवर आयसीयूमध्ये उपचार
सर्कल/ चेन्नई, करुर
तामिळनाडूमध्ये शनिवारी अभिनेता विजयच्या रॅलीत झालेल्या चेंगराचेंगरी दुर्घटनेतील मृतांचा आकडा 40 वर पोहोचला आहे. यामध्ये 16 महिला आणि 10 मुलांचा समावेश आहे. तसेच अन्य 95 जण जखमी झाले असून 51 जणांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो. या दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी टीव्हीके नेत्यांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. दरम्यान, चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या एका व्यक्तीने न्यायालयात धाव घेतली असून मद्रास उच्च न्यायालयात त्याच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. याचिकाकर्त्याने विजय आणि त्याच्या ‘टीव्हीके’ पक्षाच्या रॅलींवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
विजयचा पक्ष तामिळनाडू निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे. अभिनेता विजयने 2 फेब्रुवारी 2024 रोजी टीव्हीकेची स्थापना करताना 2026 च्या विधानसभा निवडणुका लढवण्याचा आपला इरादा जाहीर केला होता. आगामी निवडणुकांमुळेच तो राज्यभर रॅली काढत आहे. याचदरम्यान करूरमध्ये रॅली काढण्यात आली असताना 10,000 लोकांना परवानगी देण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात 50,000 हून अधिक लोक जमल्यामुळे चेंगराचेंगरीचे गालबोट लागल्याचा दावा प्रथमदर्शनी करण्यात येत आहे. राज्य सरकारने या घटनेचा रितसर तपास करण्यासाठी चौकशी समिती नियुक्त केली असून त्यातून नेमकी कारणे पुढे येऊ शकतात.
60 फूट लांबीची प्रचार बस गर्दीच्या, 100 फूट रुंद रस्त्यावर नेल्याने चेंगराचेंगरी झाल्याचा दावा केला जात आहे. दुसरा मार्ग घेण्याऐवजी आयोजकांनी गर्दीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केल्यामुळे दबाव वाढला आणि लोक खाली पडू लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. प्रचंड गर्दीमुळे अनेक लोक व मुले बेशुद्ध पडू लागल्यामुळे चेंगराचेंगरी झाली. विजयने शांततेचे आवाहन करण्यासाठी आपले भाषण थांबवले, परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता. गर्दीमुळे रुग्णवाहिका आणि स्वयंसेवकांना मृतांपर्यंत त्वरित पोहोचणे अशक्य झाले होते.
…शब्दही सूचत नाहीत : अभिनेता विजय
अभिनेता विजयची रॅली सुरू असताना शनिवारी सायंकाळी चेंगराचेंगरीची घटना घडली होती. घटनेनंतर विजय जखमींना भेटला नाही किंवा त्याने तेथील लोकांचे सांत्वनही केले नाही. तो थेट चार्टर्ड विमानाने चेन्नईला गेला. तथापि, त्याने ‘एक्स’वर ‘माझे हृदय तुटले आहे. मला प्रचंड वेदना आणि दु:ख होत आहे.’ असे त्याने म्हटले आहे. या दुर्घटनेनंतर अभिनेत्याने या घटनेवर बोलण्यासाठी आपल्याला शब्दही सूचत नसल्याचे सांगत शोक व्यक्त केला आहे. तसेच मृत झालेल्यांच्या कुटुंबियांना अभिनेता विजयने प्रत्येकी 20 लाख रुपये आणि जखमींना 2 लाख रुपये मदत देण्याची घोषणा केली आहे.
चेंगराचेंगरी प्रकरण न्यायालयात
करूरमधील चेंगराचेंगरीची चौकशी करण्यासाठी अभिनेता विजयविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची आणि विशेष तपास पथकाकडून चौकशीची मागणी करणारी तक्रार सर्वोच्च न्यायालयाचे वकील जी. एस. मणी यांनी दाखल केली आहे. तसेच अभिनेता विजयच्या ‘टीव्हीके’ या पक्षाने रविवारी मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एम. धनापाणी यांना 27 सप्टेंबर रोजी करूर येथे झालेल्या पक्षाच्या रॅलीदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीची सीबीआय किंवा विशेष तपास पथक (एसआयटी) चौकशी करण्याचे आदेश देण्याची विनंती केली. टीव्हीकेचे नेते निर्मल कुमार म्हणाले की, न्यायाधीशांनी वकिलांना मदुराई खंडपीठात याचिका दाखल करण्याचे निर्देश दिले असून त्यावर सोमवारी दुपारी 2:15 वाजता सुनावणी होणार आहे.
चौकशीसाठी आयोग स्थापन, आर्थिक मदतीचीही घोषणा
मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपये आणि रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमींना 1 लाखांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच चेंगराचेंगरीच्या परिस्थितीची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने निवृत्त न्यायाधीश अरुणा जगदीशन यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करूर अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींना 50,000 रुपये देण्यासंबंधीची माहिती पंतप्रधान कार्यालयाच्या ‘एक्स’ हँडलवरून शेअर करण्यात आली आहे.
Comments are closed.