अयोध्या प्रकरणाची कागदपत्रे पाहता येतील.

रामभक्तांसमोर मांडले जाणार सर्व पुरावे

वृत्तसंस्था/ अयोध्या

राम मंदिर ट्रस्ट आता सर्वोच्च न्यायालयाकडून मंदिर खटल्याप्रकरणी जमा करण्यात आलेल्या ऐतिहासिक पुरावे आणि दस्तऐवजांना परत मिळविण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून हे दस्तऐवज प्राप्त केल्यावर ते अयोध्येतील संग्रहालयात सुरक्षित आणि संरक्षित करण्यात येणार आहेत. यासंबंधीची माहिती राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्र यांनी दिली आहे. अयोध्येतील आंतरराष्ट्रीय रामकथा संग्रहालय आणि मंदिराच्या उर्वरित निर्मितीकार्यांची पाहणी करत प्रगतीची समीक्षा त्यांनी केली आहे.

रामकथा संग्रहालयाचे निर्मितीकार्य वेगाने सुरू आहे. भगवान हनुमान यांच्या अत्याधुनिक गॅलरीचे कार्य दोन महिन्यांत पूर्ण होईल. आयआयटी चेन्नईच्या टीमने गॅलरीच्या सजावटीचे काम यापूर्वीच सुरू केले आहे. मार्च महिन्यापर्यंत ही गॅलरी भाविकांसाठी खुली केली जाणार असल्याचे मिश्र यांनी सांगितले.

गॅलरीची पटकथा लिहिली गेली असून ती भगवान रामांशी संबंधित प्रसंगांना सादर करणारी आहे. गॅलरीला उच्चस्तरीय अत्याधुनिक पद्धतीने सजविण्याचे काम आयआयटी चेन्नईला सोपविण्यात आले असून याकरता मंदिर ट्रस्टसोबत त्यांचा सामंजस्य करार झाला असल्याची माहिती त्यांनी दिली.

उत्खननात मिळाले पुराव्यांचे पुरावशेष

पुराव्यांच्या आधारावर सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिराच्या बाजूने ऐतिहासिक निर्णय दिला होता. भारतीय पुरात्व सर्वेक्षणाच्या उत्खननात प्राप्त सर्व पुरावे सध्या सर्वोच्च न्यायालयाकडे सुरक्षित आहेत. याप्रकरणी आव्हान देणारा कुणीच नाही. अशास्थितीत राम मंदिर ट्रस्टकडून सर्वोच्च न्यायालयाला औपचारिक पत्र लिहून या दस्तऐवजांना सोपविण्याची विनंती केली जाणार आहे. ऐतिहासिक पुराव्यांना मंदिर परिसरात संरक्षित केले जावे असे उद्गार मिश्र यांनी काढले आहेत.

रामायणाच्या दुर्लभ प्रती

राम मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावरील गर्भगृहात देशविदेशातील विविध भाषांमध्ये लिखित प्राचीन रामायणाच्या मूळ प्रती ठेवण्यात येणार आहेत. येथे रामरक्षा तंत्राचीही स्थापना करण्यात येईल. देशाच्या विविध प्रांतांच्या पर्यटन आणि संस्कृती विभागांच्या प्रमुखांनी अशाप्रकारच्या उपलब्ध दुर्लभ पांडुलिपिंना मंदिराच्या संग्रहालयात संरक्षित करण्यासाठी पत्र पाठविण्यात आले आहे. अनेक ठिकाणांवरुन उत्तरही मिळाले आहे. वाल्मिकी रामायणाच्या एका प्राचीन प्रतीला राम मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावरील गर्भगृहात स्थापित करण्यासाठी वाराणसी संस्कृत विद्यापीठाशी संपर्क साधला जातोय. राम मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावरील संग्रहालय भाविकांसाठी  श्रद्धा, इतिहास आणि संस्कृतीचे केंद्र ठरेल असे वक्तव्य मिश्र यांनी केले आहे.

रामकथेशी निगडित दस्तऐवज आणि विविध भाषांमधील मूळ प्रतींच्या प्रमाणनासाठी तज्ञांची समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही समिती दुर्ला पत्रिका आणि मूळ प्रतींच्या प्रामाणिकतेची तपासणी करत अहवाल सादर करणार आहे. त्या अहवालाच्या आधारावर मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावर  ठेवण्यासाठी निवड  केली जाणार असल्याचे मिश्र यांनी स्पष्ट केले.

Comments are closed.