'केदारनाथ'चे दरवाजे 22 एप्रिलला उघडणार आहेत
महाशिवरात्रीच्या शुभ मुहुर्तावर तारीख निश्चित : बाबा केदारनाथच्या भक्तांची प्रतीक्षा संपली
वृत्तसंस्था/ देहराडून
उत्तराखंडमधील गढवाल हिमालयीन प्रदेशात असलेल्या प्रसिद्ध केदारनाथ मंदिराचे दरवाजे हिवाळ्यात जवळजवळ सहा महिने बंद राहिल्यानंतर 22 एप्रिल रोजी भाविकांसाठी पुन्हा उघडतील. मंदिर समितीने रविवारी महाशिवरात्रीच्या दिवशी यासंबंधीची अधिकृत घोषणा केली. महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर बाबा केदारनाथ यांचे हिवाळी आसन असलेल्या ओंकारेश्वर मंदिरात पारंपरिक प्रार्थनेनंतर धार्मिक नेते आणि वेद विद्वानांनी पंचांगाचा अभ्यास करत दरवाजे उघडण्यासाठी शुभ मुहूर्त निश्चित केल्याचे श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीचे जनसंपर्क अधिकारी डॉ. हरीश गौर यांनी सांगितले.
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या केदारनाथ मंदिराचे दरवाजे या वर्षी 22 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता भाविकांसाठी उघडणार असल्याचे जाहीर करण्यात आले. केदारनाथ मंदिर उघडण्याच्या शुभ मुहूर्तासह गढवाल हिमालयातील चार पवित्र तीर्थस्थळांच्या तारखा देखील निश्चित झाल्या आहेत. बद्रीनाथ धामचे दरवाजे 23 एप्रिल रोजी भाविकांसाठी उघडतील, तर गंगोत्री धाम आणि यमुनोत्री धामचे दरवाजे 19 एप्रिल रोजी अक्षय्य तृतीयेला उघडतील. दरवाजे उघडण्याच्या अधिकृत घोषणेसह प्रशासन आणि मंदिर समितीने तीर्थयात्रेच्या मार्गावरील बर्फ काढून टाकण्यासाठी आणि नागरी सुविधा पुनर्संचयित करण्याची तयारी तीव्र केली आहे. हिमालयातील कठीण भौगोलिक परिस्थितीत भारत आणि परदेशातून येणाऱ्या लाखो यात्रेकरूंना त्यांचा प्रवास सुलभ करण्यासाठी निवास, आरोग्य आणि सुरक्षेची कडक व्यवस्था केली जात आहे.
‘जय बाबा केदार’चा जयघोष
सुमारे साडेनऊ क्विंटल फुलांनी सजवलेल्या ओंकारेश्वर मंदिरात महाशिवरात्रीच्या निमित्ताने रविवारी झालेल्या सोहळ्याला केदारनाथ मंदिराचे मुख्य पुजारी रावल भीमाशंकर लिंग, केदारनाथच्या आमदार आशा नौटियाल, मंदिर समितीचे अध्यक्ष हेमंत द्विवेदी, इतर अधिकारी, धार्मिक नेते आणि शेकडो भाविक उपस्थित होते. याप्रसंगी भाविकांनी दर्शनानंतर ‘जय बाबा केदार’चा जयघोष करत देणगीदारांनी आयोजित केलेल्या अन्न वितरण शिबिरांमधून प्रसाद घेतला.
Comments are closed.