IND vs ENG: ‘जर सामना जिंकलो असतो तर’, लॉर्ड्समधील पराभवावर मोहम्मद सिराजचं भावुक वक्तव्य

इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्स कसोटीत भारताला 22 धावांनी पराभव पत्करावा लागला. रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) एका टोकाला खंबीरपणे उभा राहून टीम इंडियासाठी लढत होता. पण भारताला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला. भारताची शेवटची विकेट मोहम्मद सिराजची (Mohmmed Siraj) होती, जो दुर्दैवाने बाद झाला. बाद झाल्यानंतर सिराज थेट खेळपट्टीवर बसूनच राहिला होता. त्याच्या बाद होण्यामुळे कोट्यवधी भारतीय चाहत्यांचं मन तुटलं. आता, चौथ्या कसोटीपूर्वी सिराजने या पराभवावर आपली भावना व्यक्त केली आहे.

मँचेस्टर कसोटी सामन्यापूर्वी मीडियासमोर आलेल्या मोहम्मद सिराजने सांगितलं की, लॉर्ड्समधील त्या पराभवातून सावरायला त्याला वेळ लागला. सिराज म्हणाला, मी ज्या परिस्थितीत बाद झालो, जर आपण सामना जिंकलो असतो, तर मालिका 2-1 अशी झाली असती. जड्डू भाऊने (Ravindra Jadeja) खूप चांगली कामगिरी केली. जस्सी भाऊने (Jasprit Bumrah) ही 54 चेंडू खेळले.

पुढे तो म्हणाला, दिवसाच्या शेवटी एवढा पराभव झाला, तोही इतकी मेहनत करून, पण मी स्वत:ला सांगितलं की मालिका अजून संपलेली नाही आणि हेच माझ्यासाठी बूस्ट ठरलं. त्यामुळे मी ठरवलं की आता मी अजून चांगली कामगिरी करेन आणि माझ्या फलंदाजीवरही लक्ष केंद्रित करेन. कारण जेव्हा आपण परदेशात जातो, तेव्हा खालच्या फळीतील फलंदाजांच्या धावा खूप महत्त्वाच्या ठरतात. आम्ही ऑस्ट्रेलियात जेव्हा खेळलो, तेव्हाही असंच विचार करत होतो की खालच्या क्रमांकावरून जास्तीत जास्त धावा केल्या पाहिजेत. तेव्हापासून आम्ही आमच्या खालच्या फळीतील फलंदाजीवर खूप मेहनत करत आहोत.

Comments are closed.