पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार सर्किट आणि मुन्नाभाईची जुगलबंदी, राजकुमार हिरानींनी दिली महत्त्वाची अपडेट
मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपटातून सर्किट आणि मुन्नाभाईची भन्नाट जुगलबंदी पाहायला मिळाली. या चित्रपटातील ”ए मामू जादू की झप्पी दे डाल बात खत्म”, ”भाई ने बोला करने का मतलब करनेका” असे कित्येक डायलाॅग आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. त्यानंतर आलेल्या लगे रहो मुन्नाभाई या चित्रपटालाही चाहत्यांनी पसंती दर्शवली.
आता मात्र ‘मुन्नाभाई 3’ची प्रतीक्षा करणाऱ्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी तिसऱ्या भागाबाबत महत्त्वाची माहिती देत, चित्रपटाच्या पटकथेवर सध्या काम सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. अलीकडेच एका मुलाखतीत बोलताना हिरानी यांनी सांगितले की, ‘मुन्नाभाई’ चित्रपटाची फ्रँचायझी बंद पडलेली नाही. उलट, मुन्ना आणि सर्किट या लोकप्रिय जोडीला दमदार कथेसह पुन्हा मोठ्या पडद्यावर आणण्यासाठी लेखकांची टीम सातत्याने प्रयत्न करत आहे.
चाहत्यांमध्ये अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या ‘मुन्नाभाई चले अमेरिका’ या चित्रपटाबाबतही हिरानी यांनी खुलासा केला. त्यांनी सांगितले की, या चित्रपटाचा टीझर तयार करण्यात आला होता आणि त्याला प्रेक्षकांकडून भरघोस प्रतिसादही मिळाला होता. मात्र, त्यावेळी कथा परीपूर्ण झाली नव्हती. मुख्यतः ती पटकथा समाधानकारक वाटत नसल्याने तो प्रकल्प पुढे नेण्यात आला नाही. हिरानी म्हणाले की, घाईघाईने चित्रपट बनवण्यापेक्षा दर्जेदार कथा तयार करणे त्यांच्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे. त्यामुळे अनेक कल्पनांवर काम सुरू असून योग्य पटकथा तयार झाल्यानंतरच चित्रपटाचे चित्रीकरण सुरू केले जाईल. असे वृत्त टीव्ही 9 ने दिले आहे.
राजकुमार हिरानींनी दिलेल्या या माहितीनंतर पुन्हा एकदा संजय दत्त आणि अर्शद वारसी यांची लोकप्रिय ‘मुन्ना-सर्किट’ जोडी मोठ्या पडद्यावर पाहण्याची चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नसली, तरी ‘मुन्नाभाई 3’चे काम सुरू असल्याची अधिकृत पुष्टी मिळाल्याने चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Comments are closed.