निवडणूक आयोगाने सत्ताधाऱ्यांना लक्ष्मी दर्शनासाठी आजचा दिवस दान दिलेला आहे, संजय राऊत यांचा हल्लाबोल

राज्यातील महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा आता शमला आहे. परंतु निवडणूक आयोगाने सत्ताधाऱ्यांना मात्र तिळगूळ दिलेला आहे असे म्हणत, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाला सणसणीत टोला लगावला आहे. संजय राऊत यांनी बुधवार (14 जानेवारी) माध्यमांशी संवाद साधताना हे भाष्य केले आहे.
या मुद्यावर अधिक बोलताना राऊत म्हणाले, निवडणूक आयोगाने सत्ताधाऱ्यांना दिलेला हा तिळगूळ वेगळा आहे. आज (14 जानेवारी) प्रचाराची मुदत संपलेली असतानाही, तुम्ही राजरोसपणे प्रचार करु शकता. तोही कसा तर घरोघरी जाऊन. एकदा प्रचार संपला की तो संपतो असे आधीचे नियम होते. त्यामुळेच निवडणूक आयोगाचे हे असे वागणे संशयास्पद आहे. संजय राऊत यांनी सांगितले की, पैसे वाटप करणाऱ्यांना आता बदडले जात आहे. आज दिवसभर हा बदडण्याचा कार्यक्रम होईल. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही हे शिंदे गट आणि भाजपच्या बाबतीत त्यांनी म्हटले. हिंदु,मुसलमान आणि पैशाचे वाटप याशिवाय हे निवडणुका जिंकू शकत नाही. यांना कोणताही विचार नाही, फक्त पैशाचे वारेमाप वाटप आणि सत्तेचा वापर म्हणून आमचं या सर्व प्रकारावर बारकाईने लक्ष आहे.
निवडणूक आयोगाने आधीच्या सर्व नियमांना बगल देत सत्ताधाऱ्यांना हा नवीन तिळगुळ दिलाय का? असा प्रश्न राऊत यांनी यावेळी विचारला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आधीच सांगून ठेवलंय, पैसे वाटताना कुणी दिसलं तर, दिसेल तिथे ठोका… तरच मुंबई आणि महाराष्ट्र वाचेल आणि मुख्य म्हणजे आपली लोकशाही वाचेल. अशांना जिथल्या तिथे ठोकलं तरच, लोकशाही नावाची संस्था वाचेल आणि ठोकणाऱ्यांना आशीर्वाद देईल”असं विधान संजय राऊत यांनी केलं.
निवडणूक आयाोगाने केवळ लक्ष्मी दर्शन करण्यासाठी सत्ताधाऱ्यांना आजचा दिवस दान दिलेला आहे, असा हल्लाबोल यावेळी राऊत यांनी केला. तसेच पैसे कोणाकडे आहेत, पैसा शिंदे गटाकडे, भाजपकडे, अजित पवारांकडे आहे. हा पैसा येतो तरी कुठून? हे काल अजित पवारांनी सांगितलं. हे सरकारमध्ये बसलेल्या शिंद्याच्या बाबतीत अजित पवाराच्या, देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांना तंतोतंत लागू आहे, असंही यावर संजय राऊत म्हणाले.

Comments are closed.