FIFA World Cup 2026 – चार वर्षांची शिक्षा!

>> मंगेश वरवडेकर

आज रात्री अंतिम शिट्टी वाजली. वर्ल्ड कप संपले. निकालानंतर विजेत्या देशात दिवाळी साजरी केली जातेय. दुसऱया देशात मातम पसरलेलं आहे. एका कर्णधाराच्या हातात सोन्याचा चषक आहे, तर दुसऱ्याच्या डोळ्यांत अश्रू. पण खरं सांगायचं तर आज हरलेत ते फक्त दोन संघ नाहीत… हरलोय आपण सारे. कारण उद्यापासून आपल्याला चार वर्षांची शिक्षा भोगायची आहे. तब्बल चार वर्षे.

वर्ल्ड कप म्हणजे चार वर्षांनी माहेरी आलेली लेक. चाळीस दिवस घर गजबजून टाकते. हसवते, रडवते, भांडणं लावते, मिठय़ा मारते आणि अचानक निघून जाते. तिच्या जाण्यानंतर घर तसंच असतं, पण घरपण हरवतं. फुटबॉल वर्ल्ड कपचही तसंच आहे. उद्या स्टेडियम तिथेच असेल. गोलपोस्ट तिथेच उभे असतील. हिरवं मैदानही तसंच असेल, पण त्यातला जीव निघून गेलेला असेल.

गेल्या चाळीस दिवसांत आपण किती जगलो! स्पेनने पुन्हा एकदा दाखवून दिलं की चेंडूवर प्रेम कसं करायचं. लामिन यमालने जगाला सांगितलं की, वय हे फक्त जन्मदाखल्यावर लिहिलेलं असतं, खेळावर नाही. मेस्सी अर्जेंटिनाचाच नव्हे तर फुटबॉल जगताचा मसिहा असल्याचे दाखवून दिले. पेद्रीच्या पायाशी चेंडू आला की तो चेंडू नसून व्हायोलिन वाटायचा. फ्रान्सचा एमबाप्पे वाऱ्यालाही मागे टाकत धावत होता. ज्यूड बेलिंगहॅम मुलापासून नेता झाला. बुकायो साकाने बचावफळीची झोप उडवली. विनिसियस ज्युनियरने सांबा अजून जिवंत असल्याचं सिद्ध केलं. अर्जेंटिनाच्या ज्युलियन आल्वारेझ आणि एन्झो फर्नांडिस यांनी जिद्दीचं दुसरं नाव लिहिलं.

पण या वर्ल्ड कपची खरी कमाई महासत्तांमध्ये नव्हती. ती होती छोटय़ा देशांच्या मोठय़ा स्वप्नांमध्ये होती. मोरोक्कोने पुन्हा एकदा आफ्रिकेचा झेंडा अभिमानाने फडकावला. नॉर्वेने ब्राझीलला हरवून सांगितलं की, नाव मोठं असलं म्हणून सामना जिंकत नाही. आर्ंलग हालांदने प्रत्येक गोलसोबत जगाला एक इशारा दिला की पुढचं दशक माझं आहे. पॅरिबियनमधल्या छोटय़ाशा कुरासावने बाद फेरी गाठून सिद्ध केलं की लोकसंख्या नाही, तर धाडस वर्ल्ड कप खेळतं. काबो व्हर्डेने स्पेनच्या गटातून पुढे जात सगळय़ांना थक्क केलं. इजिप्तने आफ्रिकेची मान उंचावली. पॅराग्वेने जर्मनीला हादरा दिला. यजमान कॅनडाने आयोजनाबरोबरच खेळानेही टाळ्या मिळवल्या. या वर्ल्ड कपने फुटबॉलचा भूगोलच बदलून टाकला.

या चाळीस दिवसांत काही दिग्गजांना आपण शेवटचं सलाम केलं. काही नवखे चेहरे पहिल्यांदाच जगाच्या फिल्डवर चमकताना पाहिले. एखादा खेळाडू रडत मैदानाबाहेर गेला, कारण त्याला माहीत होतं की आता चार वर्षांनी तो इथे नसेल. तर एखादा सतरा वर्षांचा मुलगा हसत होता, कारण त्याला ठाऊक होतं की माझी खरी कहाणी आता सुरू झाली आहे. फुटबॉलने एका पिढीकडून दुसऱया पिढीकडे मशाल सुपूर्द केली.

स्टेडियमबाहेरचा विश्वचषक तर अजून मोठा होता. अर्जेंटिनाचा चाहता ब्राझीलच्या चाहत्याला मिठी मारत होता. जपानी चाहते स्टॅण्ड स्वच्छ करत होते. मोरोक्कोचे ढोल, मेक्सिकोच्या ट्रम्पेट्स, आफ्रिकेचे नृत्य, युरोपची गाणी आणि दक्षिण अमेरिकेची वेडी ऊर्जा अमेरिकेच्या रस्त्यांवर एकत्र आली होती. जगात कितीही युद्धं असली तरी फुटबॉलने चाळीस दिवसांसाठी शांततेचा तह घडवला.

आज ट्रॉफी एका संघाच्या ताब्यात गेली. तो अर्जेंटिना की स्पेन हे तुम्हाला कळलं असेल,पण खरं विश्वविजेतेपद त्या मुलाचं असेल, ज्याने आज टीव्हीसमोर बसून ठरवलं असेल की एक दिवस मीही हा चषक उचलणार. त्या वडिलांचं असेल, ज्यांनी मुलाला पहिल्यांदा वर्ल्ड कप दाखवला. त्या आजोबांचं असेल, ज्यांनी नातवाला पेले, मॅराडोना, मेस्सी आणि आता यमालच्या गोष्टी सांगितल्या. वर्ल्ड कप ट्रॉफी एका देशात जाईल, पण त्याची स्वप्नं जगभर पसरतील.

उद्यापासून पुन्हा क्लब फुटबॉल सुरू होईल. ट्रान्सफरच्या बातम्या येतील. लीग सुरू होतील. चॅम्पियन्स लीग रंगेल. पण वर्ल्ड कपचं वेड वेगळंच असतं. ते चार वर्षांनीच चढतं. जसं कुंभमेळा रोज भरत नाही, तसं वर्ल्ड कप दरवर्षी येत नाही. म्हणून त्याची ओढही वेगळी असते.

काल रात्री गॅलरी रिकामी झाली. झेंडे गुंडाळले गेले. ढोल शांत झाले. फिफाचं गाणं थांबलं. पण प्रत्येक फुटबॉलप्रेमीच्या मनात एक पॅलेंडर उघडेल. तो पुढच्या वर्ल्ड कपच्या तारखेभोवती लाल वर्तुळ मारेल. कारण आजपासून सुरू झालीय…

चार वर्षांची शिक्षा.

आणि ही अशी शिक्षा आहे की जगातला प्रत्येक फुटबॉलप्रेमी ती पुनः पुन्हा भोगायला तयार असतो. चार वर्षांनी पुन्हा एखाद्या जून-जुलैच्या रात्री आपण जागणार आहोत. पुन्हा अनोळखी देशासाठी ओरडणार आहोत. पुन्हा एखाद्या पराभूताबरोबर रडणार आहोत. पुन्हा एखाद्या विजेत्याबरोबर नाचणार आहोत.

कारण वर्ल्ड कप संपतो… फुटबॉल कधीच संपत नाही…

Comments are closed.