पहिले बुलेट ट्रेन स्टेशन पूर्ण जवळ आहे!
रेल्वे मंत्रालयाकडून छायाचित्रे जारी : 2029 पासून देशात बुलेट ट्रेन धावणार
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
देशवासियांची बुलेट ट्रेनची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. गुजरातमधील सुरत येथे भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन स्थानकाचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे. पुढील वर्षी ट्रायल रन देखील सुरू होतील. 2029 पर्यंत बुलेट ट्रेन रुळांवर धावण्यास सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे. सुरतजवळील 300 किलोमीटर लांबीच्या व्हायाडक्टचे काम आता पूर्ण झाले आहे. रेल्वे मंत्रालयाने नुकतीच काही छायाचित्रे प्रसिद्ध केली असून भारतातील बहुप्रतिक्षित पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प ‘मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल कॉरिडॉर’ प्रगतीपथावर असल्याचे दिसत आहे.
भारतातील पहिल्या बुलेट ट्रेनचे काम सध्या वेगाने सुरू आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी अलिकडेच एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यानंतर आता रेल्वे मंत्रालयाच्या अधिकृत साईटवरून बुलेट ट्रेन प्रकल्पाशी संबंधित काही छायाचित्रेही व्हायरल करण्यात आली आहेत. रेल्वेमंत्र्यांव्यतिरिक्त विविध राज्यांच्या वाहतूक मंत्र्यांनीही या प्रकल्पाशी संबंधित छायाचित्रे आणि प्रगती अहवाल सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
‘मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल कॉरिडॉर’ प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेचा एक महत्त्वाचा भाग आहे. या मेगाप्रोजेक्ट अंतर्गत 300 किमी लांबीचा व्हायाडक्ट पूर्ण झाला आहे. तसेच गुजरातमधील सुरतजवळ 40 मीटर लांबीचा बॉक्स गर्डर देखील यशस्वीरित्या बसवण्यात आला आहे. याशिवाय, अनेक नदी पूल, स्टील आणि पीएससी पूल आणि स्टेशन इमारतींचे बांधकाम देखील पूर्ण झाले आहे. जर बांधकामाचे काम याच गतीने सुरू राहिले तर सुरत ते बिलीमोरा दरम्यान बुलेट ट्रेनची चाचणी 2026 पर्यंत सुरू होऊ शकते. हा प्रकल्प 2029 पर्यंत पूर्णपणे कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीला जपानहून शिंकानसेन बुलेट ट्रेनचे डबे देखील भारतात पोहोचू शकतात.
300 किमी लांबीच्या या व्हायाडक्टपैकी 257.4 किमी लांबीचा मार्ग ‘फुल स्पॅन लाँचिंग टेक्नॉलॉजी’ वापरून बांधण्यात आला आहे. या आधुनिक पद्धतीमुळे पारंपारिक तंत्रांपेक्षा 10 पट वेगाने बांधकाम करता येते. या तंत्रात वापरल्या जाणाऱ्या स्पॅन गर्डरचे वजन सुमारे 970 टन आहे. या प्रकल्पांतर्गत आतापर्यंत 383 किमी खांब, 401 किमी पाया आणि 326 किमी गर्डर कास्टिंग पूर्ण झाले आहे. गुजरातमध्ये 157 किलोमीटरचा ट्रॅक बेड देखील घातला गेला आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव स्वत: या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे सतत निरीक्षण करत असून सोशल मीडियाद्वारे नियमित अपडेट्स शेअर करत आहेत. ही केवळ भारतातील पहिली बुलेट ट्रेन नसेल, तर ती देशाला वेग, तंत्रज्ञान आणि आधुनिकतेच्या एका नवीन दिशेने घेऊन जाईल, असा विश्वास रेल्वेमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.
एकूण 12 स्थानके : बुलेट ट्रेन कॉरिडॉरवर एकूण 12 आधुनिक स्थानके बांधली जात आहेत. यापैकी, सुरत हे भारतातील पहिले पूर्णपणे विकसित बुलेट ट्रेन स्टेशन असून त्याचे काम पूर्ण होत आले आहे. उर्वरित स्थानकांवर काम युद्धपातळीवर सुरू आहे.
‘आत्मनिर्भर’ तंत्रज्ञान : या हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पात वापरले जाणारे बहुतेक तंत्रज्ञान आणि उपकरणे भारतातच बनवण्यात आली आहेत. भारतातच लाँचिंग गॅन्ट्री, ब्रिज गॅन्ट्री, गर्डर ट्रान्सपोर्टर सारख्या अवजड यंत्रसामग्री विकसित करण्यात आल्या आहेत.
विशेष सुविधांवर भर : भारत आता हाय-स्पीड रेल्वे तंत्रज्ञानात स्वावलंबी होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. प्रवाशांना आरामदायी आणि शांत प्रवासाचा अनुभव मिळावा यासाठी आवाज कमी करण्यासाठी ‘व्हायाडक्ट’च्या दोन्ही बाजूला 3 लाखांहून अधिक ध्वनी अडथळे बसवण्यात आले आहेत.
Comments are closed.