IND vs NZ: अर्शदीप सिंग इतिहास रचण्यापासून फक्त एक पाऊल दूर! टी20 मध्ये अशी कामगिरी करणारा ठरणार पहिला भारतीय गोलंदाज
न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला 5 सामन्यांच्या (T20 Series between India vs New Zealand) टी-20 मालिकेतील चौथा सामना 30 ऑक्टोबरला ऑकलंडच्या ईडन पार्क मैदानावर खेळायचा आहे. या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगकडे (Arshdeep Singh) इतिहास रचण्याची मोठी संधी असणार आहे.
टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून अर्शदीपने भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज म्हणून चांगली कामगिरी करत जोरदार छाप पाडली आहे. आता न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या टी-20 सामन्यात त्याने आणखी 1 विकेट घेतली, तर तो टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 150 विकेट्स पूर्ण करणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरेल.
टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत केवळ 7 गोलंदाजांना 150 किंवा त्याहून अधिक विकेट्स घेता आल्या आहेत. या यादीत अफगाणिस्तानचा स्टार लेगस्पिनर राशिद खान (Rashid Khan) 199 विकेट्ससह पहिल्या क्रमांकावर आहे.
अर्शदीपने आणखी एक विकेट घेतल्यास तो 150 विकेट्सचा टप्पा गाठेल आणि या कामगिरीपर्यंत पोहोचणारा आठवा गोलंदाज बनेल. वेगवान गोलंदाजांचा विचार केला, तर टीम साऊदी आणि मुस्तफिजुर रहमान यांच्यानंतर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 150 विकेट्स घेणारा तो तिसरा वेगवान गोलंदाज ठरेल.
याशिवाय, अर्शदीपला आणखी एक विक्रम करण्याची संधी आहे. पुढील सामन्यात त्याने 150 विकेट्स पूर्ण केल्या, तर 100 किंवा त्यापेक्षा कमी डावांमध्ये हा टप्पा गाठणारा तो पहिला वेगवान गोलंदाज ठरेल. तसेच, वानिंदू हसरंगा (Vanindu Hasranga) आणि राशिद खान (Rashid Khan) यांच्यानंतर अशी कामगिरी करणारा तो तिसरा गोलंदाज बनेल.
दुसरीकडे, न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर (Mitchell Sentner) यालाही टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 150 विकेट्स पूर्ण करण्याची संधी आहे. त्याला या विक्रमासाठी केवळ एका विकेटची गरज आहे. भारताविरुद्धच्या चौथ्या टी-20 सामन्यात त्याला ही कामगिरी करता येऊ शकते.
सँटनरने 150 विकेट्स पूर्ण केल्या, तर न्यूझीलंडकडून हा टप्पा गाठणारा तो तिसरा गोलंदाज ठरेल. त्याच्याआधी माजी वेगवान गोलंदाज टीम साऊदी (Tim Saudi) आणि लेगस्पिनर ईश सोढी (Eash Sodhi) यांनी ही कामगिरी केली आहे.
Comments are closed.