Tiger Found in Himachal “उत्तराखंडातून गायब झालेला तो वाघ अखेर हिमाचल प्रदेशात सापडला”

काही दिवसांपूर्वी उत्तराखंडच्या एका अभयारण्यातून गायब झालेला बंगाली टायगर अखेर हिमाचल प्रदेशात सापडल्याचा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार उत्तराखंडच्या राजाजी राष्ट्रीय उद्यानातून बेपत्ता असणारा हा वाघ सुरक्षित आहे.

हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यातील पाँटा साहिब वनक्षेत्रात रॉयल बेंगॉल वाघ दिसल्याने वनविभाग पूर्णपणे सतर्क झाला आहे. या दुर्मिळ हालचालीमुळे हिमाचल आणि शेजारील उत्तराखंडमधील वन्यजीव अधिकारी आश्चर्यचकित झाले आहेत. वनविभागाच्या मते, हा तोच वाघ असण्याची दाट शक्यता आहे, जो गेल्या वर्षभरापासून उत्तराखंडच्या राजाजी राष्ट्रीय उद्यानातून बेपत्ता आहे.

कॅमेऱ्यात ट्रॅप झाला बंगाली टायगर

वन अधिकाऱ्यांनी सांगितले की, पाँटा साहिब वनक्षेत्रातील खरा ब्लॉकमधील एका झाडावर लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये सोमवारी वाघाची छायाचित्रे आणि व्हिडिओ क्लिप्स कैद झाल्या आणि गुरुवारी त्याच्या उपस्थितीची पुष्टी झाली. कॅमेऱ्याच्या आसपासच्या झाडांवर आढळलेल्या पावलांच्या आणि नखांच्या खुणांवरून असे सूचित होते की, वाघ गेल्या दोन-तीन दिवसांपासून या परिसरात फिरत आहे. तथापि, वाघाचे लिंग अद्याप निश्चित झालेले नाही.

जागेची पाहणी करायला येणार पथक

उत्तराखंडमधील राजाजी राष्ट्रीय उद्यान पाँटा साहिबच्या खारा ब्लॉकपासून सुमारे ८० किलोमीटर अंतरावर आहे. वन्यजीव तज्ञांच्या मते, वाघांसाठी आंतरराज्यीय प्रवासाकरिता इतके अंतर पार करणे पूर्णपणे शक्य आहे. पाँटा साहिबमधील वन अधिकाऱ्यांनी ही माहिती राजाजी राष्ट्रीय उद्यान प्रशासनाला दिली असून, जागेची पाहणी करण्यासाठी एक विशेष पथक लवकरच दाखल होणार आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव, परिसरात फिरणाऱ्या गद्दी पशुपालक समुदायांना आणि स्थानिक गावकऱ्यांना सतर्क करण्यात आले आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, गेल्याच आठवड्यात, सहा वर्षांच्या कालावधीनंतर कुल्लूच्या ग्रेटर हिमालयन राष्ट्रीय उद्यानातील कॅमेरा ट्रॅपमध्ये एक हिम बिबट्या दिसला होता.

Comments are closed.