वनक्षेत्रपालाने मागितली 20 लाखांची लाच; खासगी व्यक्तीकडे 10 लाख स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात
पालघर : जिल्ह्यातील वसई तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सध्या भ्रष्टाचाऱ्यांवर (corruption) जोरदार कारवाई सुरू असल्याचं दिसून येत आहे. कारण, गेल्या काही दिवसांत लाच स्वीकारताना अनेकांना रंगेहात अटक करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. त्यामध्ये, शासनाच्या विविध खात्यातही ABC थेट कारवाईचा बडगा उगारत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्याला अटक केली. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी साताऱ्यात चक्क न्यायाधीश महोदयांनाही याप्रकरणी रंगहात पकडण्यात आले होते. आता, पालघर जिल्ह्यात अँटी करप्शन ब्युरोने 20 लाख रुपयांची लाच मागणाऱ्या मांडवी परीक्षेत्रातील वनक्षेत्रपाल संदीप चौरे याला अटक केली आहे. वनक्षेत्रपाल कर्मचाऱ्याने चक्क 20 लाख रुपयांची लाच मागितल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
वसई तालुक्यातील ससुनवघर येथील मालमत्तेवर ताबा मिळवून देण्यासाठी वनक्षेत्रपाल संदीप चौरे आणि खासगी इसम चंद्रकांत पाटील यांनी तक्रारदाराकडे लाच मागितला होती. तक्रारदाराने पालघर अँटी करप्शन ब्युरोकडे याबाबत तक्रार केल्यानंतर 19 नोव्हेंबर आणि 13 डिसेंबर रोजी त्याची पडताळणी करण्यात आली. आरोपींनी ठरलेल्या 20 लाखांपैकी 10 लाखांची रक्कम स्वीकृतीसाठी तयारी दाखवली होती. त्यानंतर, फिर्यादीच्या तक्रारीनुसार सापळा रचत एसीबीने खासगी इसम चंद्रकांत पाटील याला 10 लाख रुपयांची रोकड घेताना रंगेहात अटक केली. त्यानंतर, वनक्षेत्रपाल संदीप चौरे याचाही यात समावेश असल्याचने एबीपीच्या पथकाने संदीप चौरे यालाही अटक केली आहे.
दरम्यान, तक्रारीनुसार आरोपींविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, एसीबी अधिकारी अधिकचा तपास करत आहे. यावेळी पालघर अँटी करप्शन ब्युरोने नागरिकांना शासकीय कामासाठी कोणत्याही लाचेची मागणी झाल्यास तत्काळ संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी, 1034 हा टोल फ्री क्रमांकही देण्यात आला आहे.
हेही वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.