'होर्मुझ'ची मुक्तता हे खरोखरच सकारात्मक लक्षण आहे.
‘ब्रिक्स’ परिषदेत अजित डोवाल यांचे प्रतिपादन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अमेरिका आणि इराण यांच्यातल्या शस्त्रसंधीनंतर आता होर्मुझची सामुद्रधुनी मुक्त करण्यात आली आहे. हे जागतिक शांततेसाठी आणि कच्च्या इंधन तेलाच्या वाहतुकीसाठी मोठेच सुचिन्ह आहे, असे प्रतिपादन भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी केले आहे. ते ब्रिक्स परिषद सदस्य राष्ट्रांच्या सुरक्षा सल्लगारांच्या परिषदेत भाषण करीत होते. ते यावर्षी या परिषदेच्या अध्यक्षस्थानी आहेत. मंगळवारपासून या परिषदेस प्रारंभ झाला असून डोवाल यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. या परिषदेत, जागतिक सुरक्षा, दहशतवादाची उत्क्रांत होत असलेली नवी रुपे, संघटित गुन्हेगारी आदी विषयांवर चर्चा होणार आहे.
ब्रिक्स हा उगवत्या अर्थव्यवस्थांचा एक अनौपचारीक गट आहे. जगाचे स्वरुप बहुकेंद्री असावे, या उद्देशाने या गटाची स्थापना करण्यात आली आहे. सदस्य देशांमध्ये आर्थिक सहकार्याला प्रोत्साहन देणे आणि दक्षिण गोलार्धातील देशांना त्यांचा आवाज उठविण्यासाठी एक व्यासपीठ मिळवून देणे, हे देखील या संघटनेचे उद्देश आहेत. या परिषदेचे अध्यक्षस्थान सध्या भारताकडे असून ही परिषद सध्या दिल्लीत आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेला ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका हे मूळ संस्थापक देश, तसेच इजिप्त, इथियोपिया, इराण आणि संयुक्त अरब अमिरात हे 2024 मध्ये समाविष्ट झालेले चार देश, यांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. बिक्स देश हे उगवत्या अर्थव्यवस्था असून त्यांची एकंदर लोकसंख्या जगाच्या लोकसंख्येच्या 49.5 टक्के आहे. मात्र, आर्थिक दृष्ट्या हे देश आता प्रगती करत आहेत, अशी माहिती या परिषदेसंबंधी देण्यात आली.
चीनशी चर्चा
भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी मंगळवारी या परिषदेच्या निमित्ताने भारतात आलेले चीनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री वांग यी यांच्याशी चर्चा केली. भारत आणि चीन त्यांच्यात पुन्हा संवादाला प्रारंभ करण्यासाठी यंत्रणा पुनरुज्जीवीत करावी, असे आवाहन वांयी यांनी केले. दोन्ही देशांनी एकमेकांच्या महत्वाच्या हितांचा सन्मान करावा. एकमेकांशी आर्थिक सहकार्य वाढवावे, भारत आणि चीन यांच्यातील सीमावाद योग्य प्रकारे हाताळला जावा आणि सीमेवरच्या स्थितीशी दोन्ही देशांच्या संबंधांना जोडू नये, असे मतप्रदर्शनही त्यांनी केले आहे. डोवाल यांनीही भारत आणि चीन यांच्या संबंधांचे महत्व विशद केले आहे.
स्थिर, पारदर्शक संबंध आवश्यक आहेत
भारत आणि चीन यांच्यात स्थिर, पारदर्शी आणि रचनात्मक द्विपक्षीय संबंध असावेत, अशी अपेक्षा आजित डोवाल यांनी व्यक्त केली आहे. चार वर्षांपूर्वी प्रारंभ झालेल्या लडाख संघर्षामुळे भारत आणि चीन यांच्यातील संबंध तणावग्रस्त झाले होते. मात्र, दोन्ही देशांच्या सेनाधिकाऱ्यांच्या अनेकदा बैठका झाल्या. त्यातून शांततेच्या मार्गाने तोडगा काढण्यात आला आणि आणि आज दोन्ही देशांच्या सेना त्यांच्या संघर्षपूर्व स्थानी परतल्या आहेत. त्यामुळे सीमेवर शांतता दिसून येत आहे. ही शांतता स्थायी रहावी, यासाठी दोन्ही देशांनी परस्पर विश्वासाच्या साहाय्याने कार्य केले पाहिजे, असे प्रतिपादन या चर्चेत अजित डोवाल यांच्याकडून केले गेले.
ब्रिक्स ही शांततावादी संघटना
ब्रिक्स ही शांततावादी संघटना असून ती जागतिक ाशंतता, युद्धमुक्त जग आणि आर्थिक उन्नती यांसाठी बांधील आहे. आज या संघटनेतील देशांचे स्थूल उत्पन्न जगाच्या 26 टक्के आहे. या जागतिक योगदानात वाढ होणे आवश्यक आहे. यासाठी एकमेकांमध्ये सहकार्य वाढविण्यावर भर देण्यात आला पाहिजे. तसेच, सध्याच्या अस्थिर आणि अनिश्चित जागतिक परिस्थितीत ब्रिक्स देशांनी एकमेकांना समजून घेऊन आधार दिला पाहिजे. दक्षिण गोलार्धातील देशांचा विकास घडविण्यासाठी सहकार्य केले पाहिजे, अशी मांडणी डोवाल यांनी केली.
दहशतवादाची नवी रुपे…
दहशतवाद हे जगासमोरचे सर्वात मोठे संकट आहे. आज दहशतवादही उत्क्रांत होत असून तो वेगवेगळी रुपे धारण करुन जगासमोर येत आहे. दहशतवादाचे हे परिवर्तीत होणारे स्वरुप आपण सर्वांनी नीट लक्षात घेणे आवश्यक असून एकत्रित उपाययोजना त्याच्या विरोधात केल्यास दहशतवाद निश्चितच रोखला जाऊ शकतो. कोणत्याही कारणास्तव दहशतवादाचे समर्थन नको, असे प्रतिपादन त्यांनी केले.
ब्रिक्स परिषदेला शानदार प्रारंभ
ड ब्रिक्स परिषदेचे अध्यक्षत्व यंदा भारताकडे, अजित डोवाल यांचे भाषण
ड दहशतवाद हा जगाचा सर्वात मोठा अडथळा असल्याचे त्यांचे प्रतिपादन
ड ब्रिक्स सदस्यदेशांमध्ये आर्थिक सहकार्य वाढविण्यासाठी भारत प्रयत्नशील
ड भारत आणि चीन यांच्यातील संबंध पारदर्शी आणि स्थिर असणे आवश्यक
Comments are closed.