6 राज्यांमधील 85 लाख विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे: राहुल गांधी
पेपर लीकवरून केंद्र सरकारवर साधला निशाणा
नवी दिल्ली : बोर्ड आणि अन्य परीक्षांचे पेपर लीक होत असल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केले. राहुल गांधी यांनी याला व्यवस्थात्मक अपयश ठरविले आहे. तसेच गंभीर समस्या ठरवत सर्व पक्ष आणि सरकारांनी मिळून यावर तोडगा काढण्यावर जोर दिला आहे. 6 राज्यांमध्ये 85 लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आहे. पेपर लीक आमच्या युवांसाठी सर्वात धोकादायक ‘पद्मव्यूह’ ठरला आहे. पेपर लीक मेहनती विद्यार्थी आणि त्यांच्या परिवारांना अनिश्चितता आणि तणावाच्या दरीत लोटतो. त्यांच्या परिश्रमाचे फळ त्यांच्याकडून हिरावून घेतो. तसेच पुढील पिढीला अप्रामाणिकपणा मेहनतीपेक्षा चांगला ठरू शकतो, असा चुकीचा संदेश देत असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. मागील वर्षी नीट पेपर लीकने पूर्ण देशाला हादरवून सोडले होते. आमच्या विरोधानंतरही मोदी सरकारने नव्या कायद्याच्या मागे लपून त्याला उपाय ठरविले, परंतु अलिकडच्या काळात घडलेल्या पेपर लीकने हा उपाय अपयशी ठरल्याचे सिद्ध केले आहे. ही गंभीर समस्या एक व्यवस्थात्मक अपयश आहे. यावर सर्व राजकीय पक्ष आणि सरकारांनी मतभेद विसरून एकत्र येत कठोर पावले उचलून ही समस्या संपवावी लागणार आहे. या परीक्षांची प्रतिष्ठा कायम राहणे आमच्या मुलांचा अधिकार आहे आणि याला कुठल्याही स्थितीत सुरक्षित ठेवावे लागेल, असे उद्गार राहुल गांधी यांनी काढले आहेत.
Comments are closed.