'नेलॉन्ग व्हॅली'चे प्रवेशद्वार पर्यटकांसाठी वर्षभर खुले असते.

भारत-चीन सीमेवर पर्यटनाला चालना : उत्तराखंडमध्ये मिळणार आता लडाखसारखा अनुभव

वृत्तसंस्था/ उत्तरकाशी

चीनला लागून असलेले देशातील तिसरे सर्वात मोठे उद्यान गंगोत्री राष्ट्रीय उद्यानातील नेलांग व्हॅली आता पर्यटकांसाठी वर्षभर खुली राहणार आहे. सरकारच्या निर्देशांनुसार, उद्यान प्रशासनाने वर्षभर पर्यटनाला चालना देण्यासाठी एक प्रमाणित कार्यप्रणाली (एसओपी) तयार केली आहे. या योजनेअंतर्गत, यावर्षी हिवाळ्याच्या हंगामात नेलांग व्हॅलीमध्ये पर्यटकांसाठीचे उपक्रम सुरक्षितपणे आणि नियंत्रित पद्धतीने आयोजित केले जातील.

गंगोत्री राष्ट्रीय उद्यानाचे दरवाजे यापूर्वी केवळ 1 एप्रिल ते 30 नोव्हेंबरपर्यंत खुले असायचे. त्यानंतरच्या काळात उद्यानातील गंगोत्री-गोमुख ट्रेक, केदारताल, गरतांग गली आणि नेलांग व्हॅली या भागांमध्ये पर्यटकांच्या प्रवेशावर निर्बंध घातले जात होते. मात्र, आता राज्यात हिवाळी पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकारने नेलांग खोऱ्यातील भैरोंघाटी ते नेलांग पर्यंतचा 23 किमीचा पट्टा आणि नेलांग ते नागापर्यंतचा 7 किमीचा पट्टा डिसेंबर ते मार्च या कालावधीत खुला ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या उपक्रमामुळे आता वर्षातील बाराही महिने या भागात देशवासियांना पर्यटनाचा आनंद लुटता येणार आहे.

दररोज 100 पर्यटकांना परवानगी

एसओपीनुसार, हिवाळ्यात नेलांग खोऱ्याला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्याही निश्चित करण्यात आली आहे. दररोज जास्तीत जास्त 100 पर्यटक आणि 20 वाहनांना परवानगी दिली जाईल. पर्यटकांना सकाळी 8 ते 11 या वेळेत प्रवेश दिला जाईल आणि सायंकाळी 5 वाजेपर्यंत उद्यानातून बाहेर पडावे लागेल. पर्यटकांसाठी शुल्क आकारणीचे वेगवेगळे दरही निश्चित करण्यात आले आहेत. तसेच या भागात कॅमेऱ्याने छायाचित्रण करण्यासाठी वेगळे शुल्क आकारले जाते. मात्र, ड्रोनने छायाचित्रण आणि व्हिडिओग्राफी करण्यास मनाई आहे. पार्क परिसरातील कचरा व्यवस्थापनासाठी प्रत्येक गटाकडून 100 रुपये इतकी सुरक्षा ठेवही घेतली जाणार आहे.

(बॉक्स करणे…)

‘छोटा लडाख’ अशी ओळख

वन विभागाने पर्यटकांकरिता एक सर्वसमावेशक कार्यप्रणाली (एसओपी) तयार केली आहे. लडाखसारखी भौगोलिक रचना असलेल्या नेलांग खोऱ्याला ‘छोटा लडाख’ म्हणूनही ओळखले जाते. हिवाळ्यात येथे वाढणाऱ्या पर्यटकांच्या संख्येमुळे केवळ उद्यानाचा महसूलच वाढणार नाही, तर भारत आणि परदेशातील पर्यटकांना निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद घेता येईल. तथापि, हिवाळ्यात उंच ठिकाणांवरून सखल ठिकाणी होणारे वन्यजीवांचे स्थलांतर त्यांच्या अधिवासाच्या संरक्षणासाठी एक आव्हान निर्माण करते.

 

पर्यटकांसाठी शुल्क आकारणी…

भारतीय: 300 रुपये प्रति पर्यटक

विदेशी : 1,200 रुपये प्रतिपर्यटक

हलकी वाहने (भारतीय) : 250 रु.

हलकी वाहने (विदेशी) : 400 रु.

मध्यम वाहने (भारतीय) : 500 रु.

मध्यम वाहने (विदेशी) : 1,000 रु.

मोठी वाहने (भारतीय) : 800 रु.

मोठी वाहने (विदेशी) : 1,200 रु.

…………

Comments are closed.