जर्मन चॅन्सेलरचा ऐतिहासिक दौरा आजपासून सुरू होत आहे.

अहमदाबादमध्ये होणार पंतप्रधान मोदी अन् फ्रेडरिक मर्ज यांची भेट : अनेक द्विपक्षीय करार होणार

वृत्तसंस्था/ अहमदाबाद

जर्मनीचे चॅन्सेलर फ्रेडरिक मर्ज यांचा दोन दिवसीय भारत दौरा आजपासून सुरू होतोय. मर्ज यांचा हा भारताचा पहिला अधिकृत दौरा असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मर्ज यांची अहमदाबाद शहरात भेट होणार आहे. दोन्ही नेते साबरमती आश्रमाचा दौरा करतील तसेच साबरमती रिव्हरफ्रंटवर आयोजित आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात सहभागी होणार आहेत. तर गांधीनगरच्या महात्मा मंदिरात द्विपक्षीय बैठका पार पडणार आहेत. अमेरिका आणि भारतादरम्यान व्यापार करारावरून तणाव असताना जर्मनीच्या चॅन्सेलरचा हा दौरा होत असल्याने याला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.

अहमदाबादमध्ये दोन्ही नेते भारत-जर्मनी रणनीतिक भागीदारीत झालेल्या प्रगतीची समीक्षा करतील, या भागीदारीने अलिकडेच 25 वर्षे पूर्ण केली आहेत. दोन्ही नेत्यांदरम्यान व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, शिक्षण, कौशल्य विकासातील सहकार्य आणखी मजबूत करण्यावर चर्चा होणार आहे. तसेच संरक्षण आणि सुरक्षा, विज्ञान, नवोन्मेष आणि संशोधन, हरित आणि निरंतर विकास, दोन्ही देशांच्या लोकांदरम्यान संबंधांच्या महत्त्वपूर्ण क्षेत्रांमध्ये सहकार्य आणखी वाढविण्यावर लक्ष केंद्रीत असणार आहे.

दौरा महत्वाचा?

मर्ज यांनी चॅन्सेलर म्हणून स्वत:च्या पहिल्या आशिया दौऱ्यासाठी भारताची निवड केली आहे. अशाप्रकारे त्यांनी एक जुनी परंपरा मोडली असून यात जर्मन नेता सर्वसाधारणपणे चीन किंवा जपानची निवड करत होता. हे जर्मनीच्या विदेश धोरणात भारताचे वाढते रणनीतिक महत्त्व दाखविते. जर्मनी युरोपमध्ये भारताच्या सर्वात महत्त्वपूर्ण आर्थिक भागीदारांपैकी एक आहे. या दौऱ्यामुळे भारत-जर्मनी संबंध आणखी अधिक रणनीतिक दिशेने पुढे जातील अशी अपेक्षा आहे. पंतप्रधान मोदी आणि चॅन्सेलर मर्ज क्षेत्रीय आणि जागतिक महत्त्वाच्या मुद्द्यांवर विचारांचे आदान-प्रदान करतील. तसेच दोन्ही देशांच्या व्यापार आणि उद्योग जगताच्या प्रमुखांसोबत चर्चा होणार आहे. दोन्ही देशांदरम्यान अनेक करारांवर स्वाक्षरी होण्याचीही शक्यता आहे.

मोदी-मर्ज भेटीवर जगाची नजर

मोदी आणि मर्ज प्रमुख क्षेत्रीय आणि जागतिक घटनाक्रमांवरही विचारांचे आदान-प्रदान करतील असे मानले जातेय. दोन्ही देश युक्रेनवरील युद्धापासून हिंद-प्रशांतमध्ये बदलती समीकरणे आणि अमेरिकेकडू मिळत असलेल्या बदलत्या संकेतांनाही पाहत आहेत. जर्मन चॅन्सेलरच्या दौऱ्याला आता बर्लिनचा नवी दिल्लीसोबत एकसारख्या रणनीतिक दिशेने पुढे जाण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे.

व्यापारापासून संरक्षण सहकार्य वृद्धींगत

जर्मनी व्यापारापासून आता सुरक्षा आणि संरक्षण सहकार्याच्या दिशेने पावले टाकू शकतो. भारत प्रोजेक्ट 75आय अंर्तत 6 अत्याधुनिक पाणबुडी निर्मितीसाठी जर्मनीसोबत 8 अब्ज डॉलर्सचा करार करण्याच्या समीप आहे. भारताच्या वतीने हे पाऊल स्वत:च्या नौसैनिक क्षमतांना वाढविणे आणि मेक इन इंडिया पुढाकारासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. भारतासाठी हे संरक्षण भागीदारीत विविधता निर्माण करणे, स्वदेशी क्षमता तयार करणे आणि सातत्याने अनिश्चित होणाऱ्या जागतिक वातावरणात एकसारखा विचार करणाऱ्या शक्तींसोबत काम करण्याच्या स्वत:च्या दीर्घकालीन उद्देशासोबत ताळमेळ साधणारे आहे.

 

Comments are closed.