सरकारकडे दिशा आणि धोरणाचा अभाव आहे.
राहुल गांधी यांचा आरोप
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी मोदी सरकारवर देशासमोरील सध्याच्या आर्थिक परिस्थितीला तोंड देण्यासाठी आवश्यक दिशा आणि रणनीतीचा अभाव असल्याचा आरोप केला. गॅस सिलिंडर टंचाईच्या मुद्द्यावरून सरकारवर टीकेची झोड उठवताना त्यांनी सर्वसामान्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा दावा केला. तसेच पुढील महिन्यात पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरी या राज्य-केंद्रशासित प्रदेशात निवडणुका झाल्यानंतर सरकार पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या किमती वाढवू शकते, अशी चिंताही गांधी यांनी व्यक्त केली.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते असलेल्या गांधी यांनी शनिवारी सरकारवर तोफ डागली. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन आणि औद्योगिक इंधनाच्या किमतींमधील मोठी वाढ यामुळे महागाई अटळपणे वाढेल, ज्याचा परिणाम प्रत्येक भारतीयावर होईल. सरकार जरी ‘पोकळ वक्तव्ये’ करत असले आणि सर्व काही ‘सामान्य’ असल्याचा दावा करत असले तरी वस्तुस्थिती वेगळीच आहे. दैनंदिन वस्तूंच्या वाढत्या किमतींचा परिणाम प्रत्येक कुटुंबावर होईल, असेही ते पुढे म्हणाले. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे 100 च्या दिशेने होणारे अवमूल्यन आणि औद्योगिक इंधनाच्या किमतींमधील मोठी वाढही केवळ आकडेवारी नाही, तर येऊ घातलेल्या महागाईची स्पष्ट चिन्हे आहेत, असे ट्विट त्यांनी केले आहे.
Comments are closed.