सरकार शेतकर्‍यांच्या उभ्या राहणार आहे.

व्यापार शुल्कासंदर्भात पंतप्रधान मोदी यांचे वक्तव्य : गुजरात दौऱ्यात भव्य रोड शो

वृत्तसंस्था / अहमदाबाद

माझ्यावर कितीही दबाव आला, तरी मी शेतकऱ्यांची पाठराखण करण्याचे धोरण सोडणार नाही, अशी स्पष्टोक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी भारतालवर लागू केलेले 50 टक्के व्यापारशुल्क येत्या दोन दिवसांमध्ये कार्यान्वित होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांचे हे विधान आहे.

आज जगात प्रत्येक जण आपापल्या आर्थिक हितसंबंधांचे राजकारण करीत आहे. तथापि, मी आणि माझ्या नेतृत्वातील केंद्र सरकार यांनी भारतातील शेतकरी, लघु उद्योजक आणि मध्यम उद्योजक यांच्या आर्थिक हितांचे रक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही सध्याच्या परिस्थितीचा अभ्यास केला असून या सर्व घटकांना भक्कम पाठींबा आणि आर्थिक साहाय्य करणार आहोत. शेतकरी, लघुउद्योजक, मत्स्यपालक, पशुपालक बंधू-भगिनींना मी आश्वस्त करु इच्छितो की, त्यांचे हित हे या केंद्र सरकारसाठी प्रथम आहे. त्यांच्या हितांचे संरक्षण करण्यासाठी आम्ही योग्य ती पावले उचलणार आहोत. त्यामुळे त्यांनी निश्चिंत असावे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबात येथे एका विशाल सभेत केले आहे.

दबाव सहन करण्यास समर्थ

आमच्यावर कितीही दबाव आला, तरी तो सहन करण्यास आम्ही समर्थ आहोत. आमच्या देशातील उद्योजकांना आम्ही या दबावाची झळ लागू देणार नाही. आजच्या स्थितीत देश आत्मनिर्भरतेच्या मार्गाने प्रगतीकडे अग्रेसर आहे. आमच्या आत्मनिर्भर भारत अभियानाला आज प्रचंड बळ मिळत आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत नेटाने उभे राहण्यासाठी आमच्या बळात नित्य वाढ करीत आहोत. गुजरात राज्य हे आमच्या या ऊर्जेचा प्रमुख स्रोत आहे. या राज्यात आम्ही गेली दोन दशके केलेल्या कष्टामुळे ही शक्ती आमच्यात निर्माण झाली आहे. त्यामुळे आमचे उद्योजक, शेतकरी, मत्स्यपालक आणि पशुपालक तसेच कारागिर आमच्याव निर्भर राहू शकतात, अशी स्पष्टोक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

अहमदाबाद येथे रोड शो

अहमदाबाद येथे सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन झाले. त्यांनी येथे एका भव्य रोड शोच्या कार्यक्रमात भाग घेतला. डोनाल्ड ट्रंप यांनी भारतावर लागू केलेल्या 50 टक्के व्यापार शुल्कासंबंधी ते भारताची कोणती भूमिका स्पष्ट करतात, याची उत्सुकता येथील सर्वांनाच होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या ठाम भूमिकेचा पुनरुच्चार केला. भारताच्या लघु-मध्यम उद्योजकांना आणि शेतकरी, मत्स्यपालक आणि पशुपालकांना संरक्षणाची आवश्यकता आहे. त्यांना अकस्मातपणे जगाच्या बाजाराशी स्पर्धा करायला लावली जाऊ शकत नाही. त्यामुळे अमेरिकेच्या व्यापार शुल्काच्या पार्श्वभूमीवर भारताच्या भूमिकेकडे केवळ या घटकांचेच नव्हे, तर साऱ्या जगाचे लक्ष लागलेले आहे. भारताचे धोरण प्रत्यक्षात काय असणार, हे येत्या आठवडाभरात स्पष्ट होईल, असे तज्ञांचे अनुमान आहे.

कोणत्या शक्यता आहेत…

भारताची अमेरिकेची व्यापार चर्चा अद्यापही होत आहे, अशी माहिती नुकतीच परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी दिली आहे. भारताने रशियाकडून कच्च्या इंधन तेलाची खरेदी करु नये, अशी अमेरिकेची अट आहे. तथापि, भारताने आत्तापर्यंत तरी ती मानलेली नाही. भारताने रशियाकडून तेल खरेदीचा पुनर्विचार गांभीर्याने करावा, अशी सूचना अमेरिकेच्या राजकीय नेत्या आणि भारताच्या सहानुभूतीदार मानल्या गेलेल्या निक्की हेली यांनीही नुकतीच केली आहे. भारताने अमेरिकेशी या संबंधात लवकरात लवकर चर्चा करुन हा या प्रश्नावर तोडगा काढावा असे त्यांचे म्हणणे आहे. या सर्व घडामोडींमुळे भारताच्या भूमिकेसंबंधी येते एक-दोन आठवडे अत्यंत महत्वाचे सिद्ध होणार आहेत.

Comments are closed.