ग्राउंड फोर्सेसने अमेरिकन रेकॉर्ड तोडला आहे.
सोशल मिडियावर 1971 युद्धाची माहिती प्रसारित
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताच्या रशियाशी असणाऱ्या संबंधांवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी केलेल्या टिप्पणीला भारतीय भूदलाने त्याच्या पद्धतीने प्रत्युत्तर दिले आहे. अमेरिकेने सातत्याने आणि दशकानुदशके पाकिस्तानला कसा शस्त्रपुरवठा केला आहे, या संबंधीची एक जुनी माहिती भारतीय भूदलाने नव्याने प्रसिद्ध केली आहे.
भारतीय भूदलाच्या पूर्व शाखेने 5 ऑगस्ट 1971 या दिवशी एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेला एक लेख ‘एक्स’ वरुन पुनर्प्रसारीत केला आहे. ‘हाच दिवस, ते वर्ष’ या मथळ्याखाली हे पुनर्प्रसारण करण्यात आले आहे. अमेरिकेने 1954 पासून पाकिस्तानला कशी शस्त्रे पुरविली आहेत, याची माहिती या लेखात देण्यात आली आहे. 1971 च्या डिसेंबर महिन्यात भारताने पाकिस्तानच्या विरोधात युद्ध केले होते. या युद्धात भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता. त्याआधी काही महिने हा लेख प्रसिद्ध झाला होता. 1954 पासून अमेरिकेने पाकिस्तानला 2 अब्ज डॉलर्सची शस्त्रास्त्रे कशी पुरविली आहेत, याची माहिती या लेखात दिली गेली होती.
त्यावेळी राज्यसभेत चर्चा
या लेखावर त्यावेळी भारताच्या राज्यसभेत चर्चा करण्यात आली होती. संरक्षण सामग्री उत्पादन मंत्री विद्याचरण शुक्ला यांनी या संबंधी माहिती दिली होती. नाटो देश आणि रशिया यांनी पाकिस्तानला शस्त्रपुरवठा केला आहे काय, अशी विचारणार भारताने केली होती. त्यावेळी रशिया आणि फ्रान्स या प्रमुख देशांनी पाकिस्तानला शस्त्रपुरवठा केला नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, अमेरिकेने पाकिस्तानला शस्त्रपुरवठा केला असल्याची माहिती अहवालात देण्यात आली होती.
चीनचाही पुरवठा
अमेरिका आणि चीन या दोन्ही देशांनी पाकिस्तानला स्वस्तात शस्त्रे पुरविली आहेत. अनेक दशकांपासून पाकिस्तान या दोन्ही देशांच्या शस्त्रांवर पोसला गेला आहे. तरीही आतापर्यंतच्या प्रत्येक युद्धात पाकिस्तानचा पराभव झाला आहे. अमेरिका आणि चीनच्या शस्त्रांमुळे त्याला विशेष लाभ झालेला नाही, असे दिसून येते. भारताने नुकतेनच पाकिस्तान विरोधात ‘सिंदूर अभियान’ चालविलेले आहे. या अभियानातही पाकिस्तानने चीन आणि तुर्कियेने दिलेल्या शस्त्रांच्या आधारावर भारतावर हल्ले करण्याचा प्रयत्न केला होता. तथापि, भारताने रशियाकडून घेतलेल्या आणि स्वदेशनिर्मित शस्त्रांच्या आधारे पाकिस्तानला प्रचंड दणका दिला.
अमेरिकेची दुहेरी नीती
भारताने रशियाकडून इंधन तेल आयात करु नये, असा अमेरिकेचा आग्रह आहे. तथापि, स्वत: अमेरिका रशियाकडून अनेक वस्तू खरेदी करत आहे. या वस्तूंमध्ये युरेनियम, पॅलाडियम सारखी महत्वाची मूलद्रव्येही आहेत. भारताने रशियाकडून तेल खरेदी केल्याने रशियाच्या संपत्तीत भर पडते आणि रशियाला युक्रेनशी युद्ध करण्यास आर्थिक पाठबळ मिळते, असे अमेरिकेचे प्रतिपादन आहे. मात्र, अमेरिका स्वत: आणि युरोपियन महासंघातील देश रशियाकडून इंधन आणि इतर महत्वाच्या वस्तू खरेदी करतात, या दुहेरी नीतीवर भारताने बोट ठेवले आहे.
Comments are closed.