एआयचा वाढता दबदबा; चीनमध्ये नोकऱ्या जाण्याची भीती, रोबोट्सकडे कामांची सूत्रे
कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर आता केवळ तंत्रज्ञानाच्या क्षेत्रापुरता मर्यादित राहिलेला नाही. चीनमध्ये विविध उद्योगांमध्ये एआय आणि रोबोट्सचा वापर वेगाने वाढत असून, त्याचा थेट परिणाम रोजगारावर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रोग्रामर, पटकथा लेखकांपासून ते डिलिव्हरी आणि मल्टिमीडिया क्षेत्रातील कर्मचाऱ्यांपर्यंत अनेक व्यावसायिकांना ऑटोमेशनमुळे आपली नोकरी धोक्यात येण्याची चिंता सतावत आहे.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार चीनच्या बीजिंगमध्ये राहणारे 40 वर्षीय संगणक प्रोग्रामर फेई झाओजुन यांचा अनुभव फार बोलका आहे. फेई यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या बॉसने एकदा कोडिंगच्या क्षेत्रात एआय माणसांची जागा घेऊ शकते का, असा प्रश्न विचारला होता. त्यानंतर अवघ्या दोन आठवड्यांत फेई आणि त्यांच्या सुमारे 160 सहकाऱ्यांना नोकरी गमवावी लागली. नोकरी गेल्यानंतर फेई यांनी नवीन नोकरीसाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केलेले नाहीत. 40 वर्षांच्या प्रोग्रामरला कंपन्या नोकरी देण्यास उत्सुक नसतील, अशी त्यांना भीती आहे. मात्र, एआयला पूर्णपणे नाकारण्याऐवजी ते त्याचा स्वीकार करण्याच्या दिशेने पावले उचलत आहेत. इतर व्यावसायिक एआयचा वापर करत असतील, तर स्पर्धेत टिकून राहण्यासाठी स्वतःलाही एआय शिकावे लागेल, असे त्यांचे मत आहे.
चीनमध्ये रोबोट्सचा वापरही झपाट्याने वाढत आहे. टपाल केंद्रांमध्ये पार्सलची वर्गवारी करण्यापासून ते अन्न पोहोचवण्यापर्यंत अनेक कामांमध्ये रोबोट्सचा वापर केला जात आहे. यामुळे मोठ्या संख्येने असलेल्या डिलिव्हरी कर्मचाऱ्यांच्या रोजगारावरही भविष्यात परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याशिवाय शॉर्ट व्हिडिओ आणि डिजिटल मनोरंजन क्षेत्रात जनरेटिव्ह एआयचा वापर वेगाने वाढत आहे. काही तज्ज्ञांच्या मते, पूर्वी विशेष प्रशिक्षण आणि कौशल्याची गरज असलेली अनेक कामे आता एआय टूल्सच्या मदतीने तुलनेने सहज करता येऊ लागली आहेत. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग आणि मल्टिमीडिया कंटेंट निर्मिती या क्षेत्रांमध्ये हा बदल विशेषतः जाणवत आहे.
एआयचा परिणाम केवळ प्रोग्रामिंगपुरता मर्यादित नाही. चीनच्या सर्जनशील क्षेत्रातही त्याचा प्रभाव वाढत आहे. 32 वर्षीय पटकथा लेखक आणि चित्रकार वांग झिचेन्ग यांच्या मते, कंपन्या आता अशा कर्मचाऱ्यांना प्राधान्य देत आहेत, जे एआयच्या मदतीने अधिक स्क्रिप्ट तयार करू शकतात, फोटो-व्हिडिओ बनवू शकतात आणि विविध एआय टूल्स प्रभावीपणे हाताळू शकतात.
वांग यांनी यापूर्वी मुलांसाठी थ्रीडी ॲनिमेटेड शैक्षणिक व्हिडिओ आणि इंटरॲक्टिव्ह कंटेंट तयार करणाऱ्या कंपनीत काम केले होते. मात्र, कंपनीने जवळपास निम्म्या पटकथा लेखकांना कामावरून कमी केले. त्यानंतर वांग यांनी नोकरी सोडून मुलांसाठी चित्रपुस्तके तयार करण्याचे फ्रीलान्स काम सुरू केले. त्यांच्या मते, एआयमुळे कामाचा वेळ नक्कीच कमी होतो; मात्र एआयने तयार केलेल्या मजकुरात अनेकदा पुनरावृत्ती जाणवते आणि सर्जनशीलतेचा अभाव असतो.
चीन सरकारने विविध उद्योगांमध्ये एआयचा वापर वाढवण्यासाठी ‘एआय प्लस’ उपक्रम सुरू केला आहे. 2030 पर्यंत एआयचा विविध क्षेत्रांमध्ये व्यापक वापर वाढवण्याच्या दिशेने चीनची वाटचाल सुरू आहे. मात्र, रोजगार बाजारावर या तंत्रज्ञानाचा नेमका किती परिणाम होत आहे, याचे मूल्यांकन अद्याप सुरू असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. चीनमधील शहरी बेरोजगारीचा दर सुमारे 5 टक्क्यांच्या आसपास आहे. तर 16 ते 24 वर्षे वयोगटातील तरुणांमधील बेरोजगारीचे प्रमाण यापेक्षा लक्षणीयरीत्या अधिक आहे. अशा परिस्थितीत एआयमुळे नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतील, अशी अपेक्षा असतानाच पारंपरिक नोकऱ्या कमी होण्याची भीतीही वाढत आहे.
Comments are closed.