हायकोर्टाने 'जननायकन'वरील निर्णय राखून ठेवला आहे.
धुरंधर 2 चे सुनावणीवेळी दिले गेले उदाहरण : प्राइम व्हिडिओकडून निर्मात्यांना इशारा
वृत्तसंस्था/ चेन्नई
अभिनयाच्या क्षेत्रातून राजकारणात सक्रीय झालेला विजय थलपति याचा अभिनेता म्हणून अखेरचा चित्रपट ‘जन नायकन’ची त्याचे चाहते आतुरने प्रतीक्षा करत आहेत. परंतु त्याच्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप अनिश्चित आहे. सेन्सॉर प्रमाणपत्रामुळे प्रदर्शन रखडले आहे. चित्रपटाचे निर्माते आणि सेन्सॉर बोर्ड आमने-सामने असून हे प्रकरण मद्रास उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचले आहे. मंगळवारी उच्च न्यायालयात याप्रकरणी सुनावणी झाली असून निर्णय राखून ठेवण्यात आला आहे.
मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मनिंद्र मोहन श्रीवास्तव, न्यायाधीश जी. अरुल मुरुगन यांच्या खंडपीठासमोर विजय याच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाशी निगडित प्रकरणी सुनावणी झाली. अनेक तासांच्या सुनावणीनंतर उच्च न्यायालयाने सीबीएफसीकडून दाखल याचिकेवर निर्णय राखून ठेवला आहे. ‘जन नायकन’ चित्रपटाला यूए प्रमाणपत्र देण्याचा एकसदस्यीय खंडपीठाने दिलेल्या निर्देशाला सीबीएफसीने आव्हान दिले आहे.
हा चित्रपट मूळ स्वरुपात 9 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र मिळू शकले नव्हते. यानंतर निर्मात्यांनी मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली होती. 9 जानेवारी रोजी मद्रास उच्च न्यायालयाच्या एक सदस्यीय खंडपीठाने सेन्सॉर बोर्डाला प्रमाणपत्र प्रदान करण्याचा निर्देश दिला होता. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या विभागीय खंडपीठाने या निर्देशाला स्थगिती. या पार्श्वभूमीवर निर्मात्यांनी उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु त्यांच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला होता.
प्राइम व्हिडिओचा उल्लेख
उच्च न्यायालयात मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान ‘जन नायकन’चे निर्माते केव्हीएन प्रॉडक्शन्सच्या वतीने अॅडव्होकेट सतीश पराशरन यांनी स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राइम व्हिडिओच्या प्रकरणाची माहिती दिली. 31 डिसेंबर 2025 पर्यंत चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेवरून स्पष्टता न मिळाल्यास खटला दाखल करू असा इशारा अमेझॉन प्राइम व्हिडिओने निर्मात्यांना दिला होता. आता 20 जानेवारीपर्यंतही प्रदर्शनाचा मार्ग मोकळा न झाल्याने अमेझॉन प्राइम व्हिडिओकडून कोणत्याही क्षणी निर्मात्यांच्या विरोधात खटला दाखल केला जाऊ शकतो. निर्मात्यांनी या चित्रपटाकरता मोठी रक्कम गुंतविली असल्याचा युक्तिवाद अॅडव्होकेट पराशरन यांनी केला.
‘धुरंधर 2’चे उदाहरण
जन नायकन चित्रपटाला 22 देशांमध्ये प्रदर्शनाची मंजुरी मिळाली आहे. तरीही हा चित्रपट भारतात प्रदर्शनाच्या तारखेची प्रतीक्षा करत आहे. तर दुसरीकडे रणवीर सिंहच्या ‘धुरंधर 2’च्या प्रदर्शनाची यापूर्वीच घोषणा झाली असल्याचा युक्तिवाद वकील पराशरन यांनी केला. न्यायालयाने जन नायकन चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रमाणपत्राची प्रतीक्षा न करता चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केल्याप्रकरणी फटकारले होते. यावर त्यांच्या वतीने वरिष्ठ वकिल पराशरन यांनी निर्मात्यांसाठी प्रमाणपत्र मिळण्यापूर्वी प्रदर्शनाची तारीख जाहीर करणे सामान्य बाब असल्याचे सांगितले. याचकरता त्यांनी धुरंधर 2 चित्रपटाचे उदाहरण दिले.
500 कोटीच्या नुकसानीचा दावा
चित्रपटाच्या प्रदर्शनावरून होत असलेल्या विलंबामुळे चाहते आणि निर्माते चिंतेत आहेत. जन नायकनच्या प्रदर्शनास विलंब झाला तर निर्मात्यांना 500 कोटीचे नुकसान होणार असल्याचा युक्तिवाद याचिकेत करण्यात आला आहे.
Comments are closed.