'आशा-प्रेरणादायी' आवाज शांत झाला आहे

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन : आज दुपारी 4 वाजता मुंबईतील शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कार

टी. भा. प्रतिनिधी

मुंबई

आपल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या स्वरांनी सात दशकांहून अधिक काळ रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या ज्येष्ठ गायिका, पद्मविभूषण तसेच महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित सूरसम्राज्ञी आशा भोसले (वय 93 वर्षे) यांचे रविवार, 12 एप्रिल रोजी निधन झाले. शनिवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर छातीत संसर्ग झाल्यामुळे दक्षिण मुंबईतील ब्रीचकँडी ऊग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्रकृती अधिकच खालावली व त्यातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अंत्यदर्शन सोमवारी सकाळी 11 वाजल्यापासून आशा भोसले यांच्या राहत्या घरी घेता येणार असल्याची माहिती त्यांचे पुत्र, आनंद भोसले यांनी दिली आहे. त्यानंतर सोमवारी सायंकाळी 4 वाजता शिवाजी पार्क येथे अंत्यविधी होणार आहेत.

प्रसिद्ध बॉलिवूड गायिका आशा भोसले यांना 11 एप्रिल रोजी ब्रीचकँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर आपत्कालीन वैद्यकीय सेवा विभागात उपचार चालू होते. मात्र त्यांनी वयाच्या 93 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या अचानक जाण्यामुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. आशा भोसले यांना छातीच्या संसर्गामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या शरीरात प्रचंड थकवा वाढला होता. छातीचा संसर्ग झाल्यामुळे त्यांना श्वास घेण्यास अडचण निर्माण होत होती. त्यामुळे उपचारासाठी आशाताईंना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पंरतु त्यांचे अवयव निकामी झाल्यामुळे डॉक्टरांना वाचवण्यात यश आले नाही. त्यांच्या निधनानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह संगीत व कला क्षेत्रातील मान्यवरांनी शोकभावना व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली.

मागील सात दशकांपासून आशा भोसले गायन करत होत्या. त्यांनी विविध भाषेंमधून तब्बल 12 हजार गाणी गायली होती. आशाताईंनी केवळ मराठीच नाहीतर बॉलिवूड आणि संपूर्ण संगीत क्षेत्रात आपल्या नावाचा ठसा उमटला होता. मराठी, बंगाली, गुजराती, तमिळ, तेलुगू इत्यादी वेगवेगळ्या भाषेंमध्ये त्यांनी गाणी गायली होती.

आशा भोसले यांचा जन्म 8 सप्टेंबर 1933 रोजी सांगलीत झाला. वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्याकडून त्यांना गाण्याचा वारसा मिळाला. अवघ्या 9 व्या वर्षी वडिलांचे छत्र हरपल्यामुळे कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आणि लता दीदींवर आली. 1943 मध्ये ‘माझा बाळ’ या मराठी चित्रपटातील ‘चला चला नव बाळा’ हे त्यांचे पहिले गाणे होते. 1948 मध्ये ‘चुनरिया’ चित्रपटातील ‘सावन आया’ या गाण्याने त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले.

सुऊवातीच्या काळात मोठ्या गायिकांकडे (उदा. लता मंगेशकर, गीता दत्त) उरलेली गाणी किंवा ‘बी’ ग्रेड चित्रपटांतील गाणी आशाताईंच्या वाट्याला येत असत. ओ. पी. नय्यर यांनी आशाताईंच्या आवाजातील वेगळेपण ओळखले. ‘नया दौर’ (1957) मधील ‘मांग के साथ तुम्हारा’ आणि ‘उडे जब जब जुल्पें तेरी’ या गाण्यांनी त्यांना मोठी लोकप्रियता मिळवून दिली. त्या काळात त्यांनी शास्त्राrय संगीत, कव्वाली आणि रोमँटिक गाण्यांमध्ये आपला ठसा उमटवला.

एका अष्टपैलू कारकिर्दीचा प्रवास

आशा भोसले यांनी केवळ मराठी आणि हिंदीच नव्हे, तर 20 पेक्षा जास्त भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये 12,000 हून अधिक गाणी गायली आहेत. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी रोमँटिक गाणी, गझल, शास्त्राrय संगीत आणि ‘दम मारो दम’ सारखी पॉप गाणी गाऊन आपले अष्टपैलूत्व सिद्ध केले होते. आर. डी. बर्मन (पंचमदा) आणि आशा भोसले यांच्या जोडीने भारतीय संगीतात क्रांती घडवली. ‘दम मारो दम’ (हरे रामा हरे कृष्णा), ‘पिया तू अब तो आजा’ (कारवाँ) यांसारख्या गाण्यांमुळे त्यांना ‘पॉप क्वीन’ ही नवी ओळख मिळाली. ‘उमराव जान’ (1981) मधील गझल गाऊन त्यांनी आपण केवळ पॉपच नाही तर अत्यंत गंभीर आणि शास्त्राrय ढंगाची गाणीही लीलया गाऊ शकतो हे त्यांनी सिद्ध केले. या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

प्रयोगशीलता आणि नवीन पिढीशी जुळवून घेणे

वयाच्या साठीनंतरही आशाताईंनी आपला आवाज तऊण ठेवला. 1995 मध्ये ए. आर. रहमान यांच्या ‘रंगीला’ चित्रपटातील ‘तनहा तनहा’ आणि ‘याई रे’ गाण्यांच्या माध्यमातून त्यांनी नव्या पिढीलाही वेड लावले. त्यांनी ‘जानम समझा करो’सारखे पॉप अल्बम्स काढले आणि ब्रिटिश बँड ‘कॉर्ड रेड’ तसेच बॉब जॉर्ज यांसारख्या आंतरराष्ट्रीय कलाकारांसोबत काम केले.

आशाताईच्या जीवनातील काही टप्पे

– 8 सप्टेंबर 1933 रोजी जन्मलेल्या आशा भोसले यांनी वयाच्या अवघ्या 10 व्या वर्षापासून गायनाला सुऊवात

– 1950 ते 1960 च्या दशकात त्यांनी गायलेली गाणी आजही तितकीच लेकप्रिय

– शास्त्राrय संगीत, गझल, भजन, कॅबरे आणि पॉप अशा विविध प्रकारांमध्ये त्यांनी स्वत:ला सिद्ध केले

– ‘दिल चीज क्या है’, ‘उडे जब जब जुल्फे तेरी’ आणि ‘चौन से हमको कभी’ यांसारखी अजरामर गाणी त्यांच्या अफाट प्रतिभेची साक्ष देतात.

– आर. डी. बर्मन यांच्यासोबतच्या त्यांच्या गाण्यांनी चित्रपट संगीताला एक वेगळीच उंची मिळवून दिली.

– त्यांच्या असामान्य कार्याची दखल घेत त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.

– 2008 मध्ये देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक असलेला पद्मविभूषणने त्यांना गौरवण्यात आले.

– चित्रपटसफष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल 2000 मध्ये त्यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला.

– महाराष्ट्राचा सर्वोच्च सन्मान असलेला ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार 2021 मध्ये त्यांना सन्मानित करण्यात आले.

– तब्बल सातवेळा त्यांना ‘फिल्मफेअर’ सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार देण्यात आला.

मुख्यमंत्र्यांनी घेतले पार्थिवाचे दर्शन

आशाताईंच्या निधनाचे वृत्त समजताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या राहत्या घरी जाऊन पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार, आमदार सुनील शिंदे, आमदार प्रसाद लाड यांनीही श्रद्धांजली अर्पण केली.

संगीत विश्वात मोठी पोकळी : द्रौपदी मुर्मू, राष्ट्रपती

आशा भोसले यांच्या निधनामुळे संगीत विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांनी भारतात एक वेगळेच संगीताचे युग निर्माण केले. त्यांच्याशी वैयक्तिक झालेल्या चर्चेच्या अनेक आठवणी माझ्या मनात आहेत, असे म्हणत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आशाताईंना श्रद्धाजंली वाहिली आहे.

अद्वितीय संगीताने सांस्कृतिक वारसा समृद्ध : पंतप्रधान

भारतातील सर्वात ख्यातनाम आणि अष्टपैलू आवाजांपैकी एक असलेल्या आशा भोसलेजी यांच्या निधनाने अतिशय दु:ख झाले. त्यांच्या अनेक दशकांच्या अद्वितीय संगीत प्रवासाने आपल्या सांस्कृतिक वारशाला समफद्ध केले. जगभरातील असंख्य लोकांच्या मनाला स्पर्श केला. भावपूर्ण गीतांपासून ते जोशपूर्ण संगीत रचनांपर्यंत त्यांच्या आवाजात कालातीत तेज होते. त्यांच्याशी झालेल्या संवादांच्या आठवणी मी सदैव जपून ठेवेन, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

मंगेशकर घराण्यातील आणखी एक तारा निखळला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

तीन वर्षांपूर्वी धडाक्यात नव्वदी साजरी करणाऱ्या आशाताईंच्या निधनाचे वफत्त अतिशय दु:खद आहे. त्यांच्या निधनाने मंगेशकर घराण्यातील लतादीदींनंतर आणखी एक तारा निखळला आहे. सुरांची सुंदर बाग आज उजाड झाली, अशी शोकमग्न भावना व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ गायिका, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण आशा भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

आशाताईंमुळे भारतीय संगीत अधिक सममृद्ध : केंद्रीय मंत्री अमित शाह

आज प्रत्येक भारतीयासाठी आणि विशेषत: माझ्यासारख्या प्रत्येक संगीतप्रेमींसाठी अत्यंत दु:खाचा दिवस आहे. आज सर्वांच्या लाडक्या आशाताई आपल्यात राहिलेल्या नाहीत. आशाताईंनी केवळ आपल्या मधुर आवाजाने आणि अद्वितीय प्रतिभेने वेगळी ओळख निर्माण केली नाही, तर आपल्या सुरांनी भारतीय संगीत अधिक समफद्ध केले. कोणत्याही प्रकारच्या संगीताशी जुळवून घेण्याची त्यांची विलक्षण क्षमता प्रत्येकाच्या मनाला भुरळ घालत असे. आपल्या आवाजाने कोट्यावधी हृदयांना स्पर्श करणाऱ्या आशाजींनी हिंदी, मराठी, बांगला, तमिळ, गुजराती अशा अनेक भाषांमध्ये तसेच लोकगीतांमध्येही आपली अमिट छाप सोडली, अशा शब्दांमध्ये मंत्री अमित शाह यांनी आशाताईंना श्रद्धाजंली अर्पण केली आहे.

Comments are closed.