द हंड्रेड 2026 लिलाव: काव्या मारनचा वादग्रस्त निर्णय, पाकिस्तानी खेळाडूवर लुटले 2.34 कोटी

खेळामध्ये काहीही होऊ शकते, असे म्हणतात. आता ते सत्यात उतरताना दिसत आहेत. लीग कोणतीही असो जेथे भारतीय पैसा असेल तेथे पाकिस्तानी खेळाडू नसणार. मग ती दक्षिण आफ्रिकेची एसए २० असू दे किंवा यूएईची एलटी२०. आता मात्र त्या वाक्यात बदल करावा लागणार आहे. सीमारेषेचा परिणाम आता खेळाडूंच्या लिलावामध्ये कमी होताना दिसत आहे. गुरुवारी (१२ मार्च) त्याचा प्रत्यय आला. द हंड्रेड लीगमध्ये सनरायझर्स हैद्राबादने पाकिस्तानचा फिरकी गोलंदाजाला पाठिंबा दिला आहे.
लंडनमध्ये झालेल्या पहिल्या पुरुषांच्या द हंड्रेड लिलावामध्ये सनरायझर्स लीड्सने फिरकी गोलंदाज अबरार अहमदला 2.34 कोटी रुपयांना संघात विकत घेतले. ज्यामुळे तो या स्पर्धेत भारतीय मालकीच्या संघाने करारबद्ध केलेला पहिला पाकिस्तानी खेळाडू बनला. सनरायझर्स लीड्सचे नेतृत्व इंग्लंडचा टी-२० कर्णधार हॅरी ब्रूक करेल. लिलावावेळी फ्रँचायझीची प्रमुख व्यक्ती आणि सीईओ म्हणून काम करणाऱ्या काव्या मारन उपस्थित होत्या.
इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) मालकी हक्क असलेल्या संघाने पाकिस्तानी क्रिकेटपटूशी करार करण्याची ही अनेक वर्षांनंतरची पहिलीच वेळ आहे. द हंड्रेडच्या आठ फ्रँचायजींपैकी चार भारतीय मालकीचे आहेत. त्यामध्ये मँचेस्टर सुपर जायंट्स, एमआय लंडन, साउथर्न ब्रेव्ह आणि सनरायझर्स लीड्स यांचा समावेश आहे.
या लिलावामध्ये विकत गेलेला अबरार हा उस्मान तारिकनंतरचा दुसरा पाकिस्तानी खेळाडू ठरला आहे. उस्मानला बर्मिंगहॅम फिनिक्सने विकत घेतले आहे.
लिलावाआधी पाकिस्तानी खेळाडूंमध्ये केवळ बाकी चार फ्रॅंचायजी (भारतीय नसलेले) मालक रस दाखवतील, अशी चर्चा होती. त्यामध्ये इंग्लंड आणि वेल्सने लगेचच हस्तक्षेप केला आणि केवळ गुणवत्तेच्या आधारांवर खेळाडूंना घ्या, असे स्पष्ट केले होते. टीकाकरांना शांत करण्यासाठी सनरायझर्सने पहिले पाऊल टाकलेले दिसते.
Comments are closed.