देशाच्या विकासात महिलांची भूमिका महत्त्वाची आहे

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचा संदेश

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशाला संबोधित केले आहे. देशाचे युवा सोनेरी भविष्यावरून विश्वास मजबूत करत आहेत. आमचे कलाकार, शिल्पकार आमच्या समृद्ध परंपरांना आधुनिक अभिव्यक्ती देत आहेत. देशाच्या विकासाच्या नारीशक्तीची भूमिका महत्त्वपूर्ण असून मुली देशाच्या विकासात सक्रीय योगदान देत असल्याचे उद्गार राष्ट्रपतींनी  काढले आहेत.

आमची राज्यघटना जागतिक इतिहासाच्या सर्वात मोठ्या प्रजासत्ताकाचा मूलभूत दस्तऐवज आहे. एकतेच्या भावनेला चालना देण्यासाठी करण्यात आलेला प्रत्येक प्रयत्न अत्यंत कौतुकास्पद असल्याचे राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या.

महिलांचे सक्रीय अन् समर्थ होणे देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आमच्या भगिनी आणि मुली परंपरागत रुढींना मागे टाकत वाटचाल करत आहेत. महिला देशाच्या समग्र विकासात सक्रीय योगदान देत आहेत. विकसित भारताच्या जडणघडणीत नारीशक्तीची भूमिका महत्त्वपूर्ण राहणार आहे. त्यांच्या वाढणाऱ्या योगदानामुळे आमचा देश महिला-पुरुष समानतेवर आधारित समावेशक प्रजासत्ताकाचे उदाहरण सादर करणार असल्याचे राष्ट्रपतींनी नमूद पेले आहे.

स्वयंसहाय्य गटाचा उल्लेख

महिलाच्या आरोग्य, शिक्षण, सुरक्षा आणि आर्थिक सशक्तीकरणासाठी करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय प्रयत्नांमुळे अनेक क्षेत्रांमध्ये महिलांची भागीदारी वाढली आहे. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानामुळे मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळाले आहे. ‘पंतप्रधान जन-धन योजने’च्या अंतर्गत आतापर्यंत 57 कोटीहून अधिक बँक खाती उघडण्यात आली आहेत. यातील जवळपास 56 टक्के खाती महिलांची आहेत. स्वयंसहाय्य गटांशी जोडल्या गेलेल्या 10 कोटीहून अधिक भगिनी विकासाची नवी व्याख्या लिहित आहेत. क्रीडाक्षेत्रात आमच्या मुलींनी जागतिक स्तरावर नवे विक्रम स्थापित केले आहेत, असे राष्ट्रपतींनी म्हटले आहे.

क्रीडाक्षेत्रात भरीव यश

मागील वर्षी नेव्हेंबरमध्ये देशाच्या मुलींनी आयसीसी महिला विश्वचषक आणि त्यानंतर दृष्टीबाधित महिलांचा टी-20 विश्वचषक जिंकून सुवर्णाक्षरांनी इतिहास रचला आहे. मागील वर्षीच बुद्धिबळ विश्वचषकाचा अंतिम सामना भारताच्या दोन मुलींदरम्यानच खेळला गेला. हा क्रीडाजगतातील देशाच्या मुलींच्या वर्चस्वाचा पुरावा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला लोकप्रतिनिधींची संख्या जवळपास 46 टक्के आहे. महिलांच्या राजकीय सशक्तीकरणाला नवी उंची देणाऱ्या ‘नारीशक्ती अधिनियमामुळे’ महिलांच्या नेतृत्वाकडून विकासाच्या विचाराला अभूतपूर्व शक्ती मिळणार असल्याचे राष्ट्रपती मुर्मू यांनी म्हटले आहे.

विविध क्षेत्रांमध्ये अग्रणी राहिलेल्या भारताच्या महान वारशामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण काम म्हणजे देशाने पारतंत्र्याच्या मानसिकतेच्या अवशेषांपासून मुक्त होण्याचा कालबद्ध संकल्प घेतला आहे. आजचा भारत, नव्या आत्मविश्वासासहृ स्वत:च्या गौरवशाली परंपरांबद्दल जागृत होत वाटचाल करत आहे. अलिकडच्या वर्षांमध्ये आमच्या अध्यात्मिक परंपरेच्या पवित्रस्थळांना जन-चेतनेसोबत जोडले गेले आहे. सरकार आणि जनतेमधील अंतर कमी केले जातेय. परस्पर विश्वासावर आधारित सुशासनावर भर देत अनेक अनावश्यक नियम रद्द करण्यात आले आहेत. सर्वसामान्यांच्या हिताकरता सर्व जटिल व्यवस्थांना सुलभ करत तंत्रज्ञानाच माध्यमातून लाभार्थ्यांना सुविधांशी थेट जोडले जात असल्याचे वक्तव्य राष्ट्रपतींनी केले आहे.

भारतीय ज्ञान परंपरेचे जतन

भारतीय ज्ञान पंरपरेत दर्शन, चिकित्सा, खगोलशास्त्र, गणित, साहित्य तसेच कलेचा महान वारसा उपलब्ध आहे. ‘ज्ञान भारतम् मिशन’सारख्या प्रयत्नांद्वारे भारतीय परंपरेत उपलब्ध रचनात्मकतेला संरक्षित अन् प्रसारित केले जातेय. मिशन भारताच्या लाखो अमूल्य पांडुलिपींमध्ये संचित वारशाला  आधुनिक संदर्भांमध्ये पुढे नेणार आहे. भारतीय भाषा तसेच ज्ञान परंपरेला प्राथमिकता देत आत्मनिर्भरतेच्या प्रयत्नांना सांस्कृतिक आधार प्रदान केला जात असल्याचे राष्ट्रपतींनी स्वत:च्या संबोधनात सांगितले आहे.

Comments are closed.