INDW vs SAW: चक दे इंडियाची गोष्ट खरी ठरली! टीम इंडियाचा ‘रिअल लाइफ कबीर खान’ चर्चेत

सन 2007 मध्ये ‘चक दे इंडिया’ नावाचा एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात शाहरुख खानने ‘कबीर खान’ ही भूमिका साकारली होती. चित्रपटात कबीर खान महिला हॉकी टीमचं संपूर्ण रूप पालटतो आणि त्यांना चॅम्पियन बनवतो. आता वास्तव आयुष्यात असंच काहीसं करून दाखवलं आहे भारतीय महिला क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक अमोल मजूमदार (Amol Majumdar) यांनी. म्हणूनच जर त्यांच्या आयुष्यावर चित्रपट बनवला गेला, तर तो ‘चक दे इंडिया’चा सिक्वेल म्हणायला हरकत नाही. अमोल मजूमदार यांची कहाणी ऐकल्यावर प्रत्येकाला त्यांना सलाम करावासा वाटेल.

शालेय क्रिकेट स्पर्धेतला तो ऐतिहासिक सामना आठवा जिथे सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी 664 धावांची विक्रमी भागीदारी केली होती. त्या सामन्यात अमोल मजूमदार पॅड घालून दोन दिवस मैदानावर फलंदाजीच्या प्रतीक्षेत होते, पण त्यांची बॅटिंगची वेळच आली नाही.

यानंतर 1994 साली त्यांनी मुंबईकडून रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केलं. त्यांनी स्थानिक क्रिकेटमध्ये 50 च्या सरासरीने धावा करत 11 हजारांहून अधिक धावा केल्या. तरीदेखील त्यांना भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली नाही.

अमोल यांनी 2012 पर्यंत वाट पाहिली, पण भारतासाठी डेब्यू करण्याचं स्वप्न अपूर्णच राहिलं. अखेर 2012 मध्ये त्यांनी निवृत्ती जाहीर केली. मात्र 50 वर्षे 357 दिवसांच्या वयात अखेर त्यांचं स्वप्न पूर्ण झालं टीम इंडियाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली वर्ल्ड कप जिंकला.

निवृत्तीनंतर अमोल मजूमदार यांनी प्रशिक्षक म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली. ते भारत अंडर-19 आणि अंडर-23 संघाचे फलंदाजी प्रशिक्षक राहिले. डिसेंबर 2013 मध्ये त्यांनी नेदरलँड्स क्रिकेट संघाचे बॅटिंग सल्लागार म्हणून काम पाहिलं. 2018 ते 2020 या काळात ते राजस्थान रॉयल्स (IPL) संघाशी जोडलेले होते.

IPL मध्ये काम करत असताना ते दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय संघाचे अंतरिम बॅटिंग कोच बनले.
नंतर 2023 मध्ये त्यांची भारतीय महिला क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी (Head Coach) नियुक्ती झाली.

त्यानंतर त्यांनी संघात अनेक मोठे बदल केले आणि 2025 च्या वर्ल्ड कपसाठी तयारी सुरू केली.
आज त्याच मेहनतीचं फळ त्यांना मिळालं आहे. भारतीय चाहत्यांच्या मनात अमोल मजूमदार यांचं नाव कायमच कोरलं गेलं आहे.

Comments are closed.