भारतातील ग्राहकांचे हित प्राधान्य आहे

मध्य-पूर्वेतील युद्धजन्य स्थितीवर एस. जयशंकर यांचे राज्यसभेत वक्तव्य : सभागृहात गदारोळ

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

भारताच्या ग्राहकांच्या हिताचे रक्षण करणे, हीच आमच्या सरकारची सर्वात मोठी आणि सर्वात महत्त्वाची प्राथमिकता आहे, असे वक्तव्य भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी केले आहे. ते राज्यसभेत भाषण करत होते. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्राचा प्रारंभ सोमवारी झाला. मध्य-पूर्वेतील युद्ध आणि त्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती हा जयशंकर यांच्या वक्तव्याचा विषय होता.

मध्य-पूर्वेत गेल्या काही दिवसांपासून संघर्ष भडकला आहे. त्यामुळे जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कच्च्या इंधन तेलाच्या पुरवठा साखळ्या या संघर्षामुळे विस्कळीत होत आहेत, ही जगासाठी आणि अर्थातच भारतासाठीही मोठ्या चिंतेची बाब आहे. पुरवठा लवकर सुरळीत झाला नाही तर तेलाच्या टंचाईला तोंड द्यावे लागू शकते. सध्या तशी स्थिती नाही. भारत सरकार तेल मिळविण्यासाठी भिन्न भिन्न पर्यायांची व्यवस्था करीत आहे. आम्ही आमच्या देशातील ग्राहकांच्या ऊर्जा संरक्षणाला प्राधान्य देत आहोत. आमचे सर्व निर्णय ग्राहकांच्या हिताला अनुसरुनच घेण्यात येत आहेत, असे प्रतिपादन त्यांनी केले.

भारताचे आवाहन

सर्व संबंधितांनी संयम राखावा आणि शांततेच्या तसेच चर्चेच्या माध्यमातून सर्व समस्यांवर तोडगा काढावा, असे आवाहन भारताने 20 फेब्रुवारी 2026 या दिवशीच, म्हणजे हे युद्ध होण्यापूर्वीच केले होते. मध्य-पूर्वेत त्वरित परिस्थिती नियंत्रणात येण्याची आवश्यकता आहे. पश्चिम आशिया क्षेत्र स्थिर आणि शांततापूर्ण राहिले पाहिजे. सर्व संबंधितांनी समस्या सोडविण्यासाठी शांततेच्या आणि चर्चेच्या मार्गाचा अवलंब करावा. हा समस्या सोडविण्याचा खरा आणि विश्वासार्ह मार्ग आहे, ही भारताची भूमिका आहे, असे वक्तव्य करताना त्यांनी लवकरच त्या क्षेत्रात शांतता प्रस्थापित होईल, अशी शक्यताही जयशंकर यांनी व्यक्त केली.

भारतीयांची सुरक्षा

मध्य-पूर्वेतील अनेक देशांमध्ये एकंदर 90 लाखांहून अधिक भारतीय नागरिक कामांसाठी वास्तव्य करुन आहेत. त्यांची सुरक्षा आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. यांच्या पैकी जे नागरिक भारतात परत येऊ इच्छितात, त्यांना आणण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. आतापर्यंत 67 हजार नागरिक परत आले आहेत. आम्ही संबंधित देशांच्या प्रशासनांशी सातत्याने संपर्कात आहोत. या देशांमधील आमचे दूतावास तेथील भारतीयांच्या संपर्कात आहोत. त्यांच्यासाठी साहाय्याचे मार्ग उपलब्ध करुन देण्यात आले आहेत, अशी माहिती त्यांनी बोलताना दिली.

मानवतेच्या दृष्टिकोनातून साहाय्य

या युद्धकाळात काही दिवसांपूर्वी भारताने इराणच्या तीन नौकांना साहाय्यता केली आहे आपल्या नौकांना भारताच्या बंदरांमध्ये प्रवेश करण्याची अनुमती देण्यात यावी, अशी विनंती इराणने केली होती. मानवतेच्या तत्वावर भारताने ती मान्य केली. केरळमधील कोची बंदरात येण्यासाठी ही अनुमती होती. या नौकांमध्ये काही समस्या निर्माण झाल्या होत्या, अशी माहिती देण्यात आली होती. भारताने या नौकांना साहाय्य केवळ मानवतेच्या भूमिकेतून केले असून या साहाय्याचा संबंध कोणत्याही भू-राजकीय घटनेही नाही. या नौकांच्या दुरुस्तीनंतर त्या परत गेल्या आहेत, असेही स्पष्टीकरण जयशंकर यांनी राज्यसभेत दिले. या नौकांपैकी आयआरआयएस देना ही नौका भारतापासून दूर श्रीलंकेच्या सागरी क्षेत्रात गेल्यानंतर तेथे अमेरिकेच्या पाणबुडीने या नौकेवर पाणसुरुंगाचा मारा केला होता. त्यामुळे ही नौका बुडाली आणि नौकेवरील 80 हून अधिक खलाशी मारले गेले होते. तथापि, या घटनेचा भारताशी संबंध नव्हता. भारताने हे युद्ध आपल्या सागरी क्षेत्रात येऊ दिलेले नाही, अशा अर्थाचे वक्तव्यही जयशंकर यांनी केले आहे. मात्र, काँग्रेसने त्यावर असमाधान व्यक्त करुन पूर्ण चर्चा व्हावी अशी मागणी केली.

भारत शांततेचाच पक्षधर

ड संघर्षाच्या माध्यमातून नव्हे, तर शांततेने तोडगा काढण्याचे आवाहन

ड भारताची भूमिका स्पष्ट, संघर्ष लवकरात लवकर थांबावा, हीच इच्छा

ड इराणच्या तीन नौकांना मानवतेच्या भूमिकेतून भारताने केले साहाय्य

Comments are closed.