अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठे आंदोलन, ट्रम्पच्या धोरणांविरोधात जनतेचा एल्गार

अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या प्रशासनाच्या धोरणांविरोधात, अमेरिकभर हजारो मोर्चे आयोजित करण्यात आले आहेत. या मोर्चामध्ये हजारो नागरिकांनी घोषणाबाजी करत सहभाग घेतला. आयोजकांच्या मते, सर्व ५० राज्यांमध्ये ३,२०० हून अधिक आंदोलने नियोजित आहेत. अमेरिकेच्या इतिहासातील हा सर्वात मोठा एकदिवसीय अहिंसक निषेध असेल अशी अपेक्षा आहे. यापूर्वीच्या दोन ‘नो किंग्स’ कार्यक्रमांमध्ये लाखो लोक सहभागी झाले होते. न्यूयॉर्क, लॉस एंजेलिस आणि वॉशिंग्टनमध्ये मोठे निषेध होत आहेत, परंतु आयोजकांच्या मते, दोन-तृतीयांश कार्यक्रम प्रमुख शहरांच्या बाहेर होताना दिसत आहेत.

नो किंग्स या संकल्पने अंतर्गत, हुकूमशाही विरोधातील ही आंदोलने असून, या आंदोलनांनी अमेरिकेसह जगभरातील जनतेचे लक्ष वेधून घेतले आहे.

वॉशिंग्टनच्या नॅशनल मॉलवर, जमावाने लोकशाही समर्थक घोषणा दिल्या आणि ट्रम्प यांच्या विरोधात फलक उंचावले. मेरीलँडमधील शेवी चेस येथील एका बहुमजली वृद्धाश्रमाबाहेर, व्हीलचेअरमधील वृद्ध लोकांच्या एका गटाने येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना ‘हुकूमशाहीला विरोध करा’, ‘लोकशाही हवी असल्यास हॉर्न वाजवा’ आणि ‘ट्रम्प यांना हटवा’ असे फलक दाखवले. टेक्सासमधील ऑस्टिन येथे, सिटी हॉलबाहेर मोर्चासाठी आंदोलक जमले असताना एका ब्रास बँडने संगीताची साथ दिली आणि आंदोलनात सहभागी झाले.

इंडिव्हिजिबलच्या सह-संस्थापक लिआ ग्रीनबर्ग म्हणाल्या की, या रॅलींचा सर्वात महत्त्वाचा पैलू हा नाही की किती लोक निषेध करतील, तर ते कुठे निषेध करतील हा आहे. गेल्या वर्षी ‘नो किंग्स’ चळवळ सुरू करणाऱ्या ‘इंडिव्हिजिबल’ या गटाने आठवड्याच्या अखेरीस होणाऱ्या रॅलींच्या नियोजनात महत्त्वाची भूमिका बजावली. या वर्षाच्या अखेरीस अमेरिकेत मध्यावधी निवडणुका येत असल्याने, आयडाहो, वायोमिंग, मोंटाना आणि युटा यांसारख्या कट्टर रिपब्लिकन राज्यांमध्ये रॅली आयोजित करण्यासाठी आणि त्यात सहभागी होण्यासाठी नोंदणी करणाऱ्या लोकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे.

मात्र, व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या अबीगेल जॅक्सन यांनी या रॅलींना ‘ट्रम्प उन्माद उपचार सत्रे’ असे संबोधून फेटाळून लावले आणि त्या केवळ पत्रकारांसाठीच महत्त्वाच्या असल्याचे म्हटले आहे.

Comments are closed.