लिपुलेख पास उघडला जाईल.

भारत आणि चीन यांच्यात 6 वर्षांनंतर पुन्हा व्यापार

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

चीनशी व्यापार करण्यासाठी भारताने लिपूलेख खिंड पुन्हा मोकळी करण्याचा निर्णय घेतला आहे. सहा वर्षांपूर्वी भारताकडून या खिंडीतून होणारा व्यापार बंद करण्यात आला होता. या खिंडीतून जून 2026 पासून पुन्हा व्यापारास प्रारंभ केला जाणार आहे, असे केंद्र सरकारने शुक्रवारी स्पष्ट केले. चीनशी या संबंधात ऑगस्ट 2025 मध्ये चर्चा झाली होती. त्यावेळीच हा निर्णय घेण्यात आला होता. आता तो लागू केला जाणार आहे, अशी माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली.

लिपूलेख खिंडीप्रमाणेच हिमाचल प्रदेशातली शिपकी खिंड आणि सिक्किममधील नाथू ला खिंडही चीनशी व्यापार करण्यासाठी मोकळी केली जाणार आहे. 2020 मध्ये कोरोनाचा उद्रेक आणि त्यांनतर भारत आणि यांच्यातील लडाख संघर्ष यामुळे या सर्व खिंडी भारताने व्यापारासाठी बंद केल्या होत्या. तथापि, 2024 पासून भारताचे चीनशी संबंध सुधारले आहेत. चीनची गुंतवणूक भारतात होऊ देण्याचा निर्णयही भारताने काही दिवसांपूर्वी घेतला आहे. आता व्यापारासाठी वातावरण अनुकूल करण्याचा दोन्ही देशांचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन करण्यात आले.

जून ते सप्टेंबर या काळात व्यापार

या तीन खिंडीतून जून ते सप्टेंबर या काळात व्यापार केला जाऊ शकतो. हवामान चांगले असेल तर सप्टेंबरनंतरही वाहतूक केली जाऊ शकते. भारताने आता लिपूलेख खिंडीपर्यंत चांगला मार्ग निर्माण केला आहे. त्यामुळे व्यापारी वाहनांमधून आयात-निर्यात केली जाऊ शकते. भारतीय व्यापाऱ्यांनाही याचा लाभ होणार आहे. हा महामार्ग भारताने 2020 मध्ये बांधून पूर्ण केला होता. या खिंडींमधून आतापर्यंत खेचरे आणि मेंढ्यांचा वापर मालवाहतुकीसाठी केला जात असे. पण आता डांबरी महामार्ग निर्माण करण्यात आल्याने वाहतुकीचा वेग मोठ्या प्रमाणात वाढणार असून वाहतुकीचा खर्च मात्र, कमी होणार आहे. त्यामुळे व्यापार वृद्धीही मोठ्या प्रमाणात होईल, असे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

व्यवस्थापनासाठी गुंजी आणि धरचुला

लिपूलेख खिंडीतून होणाऱ्या वाहतुकीचे व्यवस्थापन करण्यासाठी गुंजी आणि धरचुला येथे असलेली कार्यालये आणि गोदामे उपयोगात आणण्यात येतील, असे स्थानिक प्रशासनाने स्पष्ट केले. गुंजी येथे स्टेट बँक ऑफ इंडियाचे कार्यालय, तसेच आयात शुल्क कार्यालय आणि पोलीस स्थानक यांचे निर्माणकार्य केले जात आहे. या खिंडींमधून प्रामुख्याने हस्तकौशल्य वस्तू, लोकर, काही अन्नपदार्थ आणि लहान साधने यांच्या व्यापार केला जातो. हा व्यापार भारत आणि चीनमधील  तिबेट येथील वनवासी समुदायांकडून प्रामुख्याने केला जातो. भारतातून हस्तकला वस्तूंची निर्यात केली जाते, तर चीनमधून लोकर, वस्त्रांची आयात केली जाते.

लिपूलेख खिंड कोठे आहे…

भारताच्या उत्तराखंड राज्यातील पिठोरागढ या सीमवर्ती भागात लिपूलेख ही प्रसिद्ध खिंड आहे. ही खिंड कुमाव प्रदेशात आहे. ती समुद्रसपाटीपासून 5 हजार 344 मीटर्स किंवा 17 हजार 500 फूट उंचावर आहे. ती सामरिक दृष्टीनेही महत्वाची आहे. कारण ती भारत, नेपाळ आणि चीन यांच्या तिठ्ठ्यावर आहे. ही खिंड तिबेटमधील टकालाकोट किंवा पुरांग या व्यापारी नगरानजीक असून धरचुला या नगरातून भारतीयांना ही खिंड पार करता येते. या खिंडीचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्वही मोठे आहे. पुरातन काळापासून या खिंडीतूनच प्रवास करुन कैलास पर्वत आणि मानसरोवर या हिंदूंच्या पवित्र तीर्थस्थळांची यात्रा करता येते. या खिंडीवर नेपाळनेही स्वामित्व सांगितले होते. अधून मधून त्यासंबंधी भारताचा नेपाळशी वाद होत असतो. तथापि, ही खिंड उत्तराखंड या भारताच्या राज्यात असल्याने नेपाळचा दावा तथ्यहीन असल्याचे दिसून येते. या खिंडीच्या पठारावर भारताचेच नियंत्रण आहे. ही खिंड भारताच्याच व्यवस्थापनात कार्यरत आहे.

हिमालयातून व्यापाराला पुन्हा प्रारंभ

ड भारत आणि चीन यांच्यात हिमालयातील खिंडीमधून व्यापार पुन्हा होणार

ड लडाख संघर्ष आणि कोरोना उद्रेकानंतर पुन्हा लिपूलेख खिंडीतून वाहतूक

ड आयात-निर्यात करण्यासाठी बँक, प्रशासन कार्यालये स्थापन केली जाणार

ड लिपूलेख खिंडीपर्यंत महामार्ग निर्माण झाल्याने व्यापार वेगाने केला जाणार

Comments are closed.