क्रिकेट विश्वातील सर्वात ‘दुर्दैवी’ खेळाडू! 12 वेळा ICC स्पर्धा खेळूनही रिकामी झोळी, एकदाही ट्रॉफी उंचावता आली नाही

आयसीसी विश्वचषकाचे जेतेपद मिळवणे हे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते. मात्र, क्रिकेटच्या इतिहासात असे अनेक दिग्गज होऊन गेले, ज्यांनी आपल्या खेळाने जगावर छाप पाडली, पण त्यांच्या नशिबात विश्वचषक उंचावण्याचे सुख नव्हते. वर्षानुवर्षे आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करून आणि अनेक विश्वचषकांमध्ये झुंजार कामगिरी करूनही, शेवटच्या क्षणी विजयाने त्यांना हुलकावणी दिली. मैदानावर धावांचा पाऊस पाडून किंवा विकेट्सचा डोंगर रचूनही चकाकत्या ट्रॉफीला स्पर्श करण्याचे त्यांचे स्वप्न केवळ स्वप्नच राहिले. हे खेळाडू वैयक्तिक विक्रमांच्या बाबतीत ‘महान’ ठरले, तरी विश्वविजेतेपदाच्या बाबतीत मात्र त्यांचे नशीब काहीसे ‘दुर्दैवी’ ठरले. यापैकीच एक म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा विस्फोटक खेळाडू डेव्हिड मिलर.

आयसीसी टी-20 विश्वचषक 2026मध्ये दक्षिण आफ्रिकेचा प्रवास उपांत्य फेरीत संपुष्टात आला. गेल्या विश्वचषकात उपविजेते ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेला यंदाही जेतेपदाने हुलकावणी दिली. उपांत्य फेरीमध्ये न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा दारुण पराभव केला. या पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघातील दिग्गज खेळाडू डेव्हिड मिलर याची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. क्रिकेट विश्वातील सध्याचा सर्वात दुर्दैवी खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे.

डेव्हिड मिलरने 2010 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीपासून त्याने आतापर्यंत एकूण 12 आयसीसी स्पर्धा (वनडे वर्ल्ड कप, टी-२० वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी) खेळल्या आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या 12 पैकी एकाही स्पर्धेत मिलरला विश्वविजेतेपदाची ट्रॉफी उंचावता आलेली नाही. 12 वर्षांच्या प्रवासात दक्षिण आफ्रिकेचा संघ 6 वेळा उपांत्य किंवा अंतिम फेरीपर्यंत पोहोचला, पण प्रत्येक वेळी त्यांना मोक्याच्या क्षणी पराभवाचा सामना करावा लागला. 2024 च्या टी-20 विश्वचषकात दक्षिण आफ्रिका फायनलमध्ये पराभूत झाली, तर 2026 मध्ये त्यांचा प्रवास सेमीफायनलमध्येच थांबला.

नशिबाची साथ नाही?

दक्षिण आफ्रिकेने 2026 मध्ये ‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप’चे (WTC) विजेतेपद मिळवून आपला ‘चोकर’ हा शिक्का पुसण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, डेव्हिड मिलर हा केवळ मर्यादित षटकांच्या क्रिकेटचा तज्ज्ञ असल्याने तो त्या कसोटी संघाचा भाग नव्हता. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या मिलरच्या खात्यात अजूनही एकही आयसीसी ट्रॉफी जमा झालेली नाही.

वर्ल्डकपला वादाचं गालबोट; ICC कडून इंग्लंडला झुकते माप; विशेष चार्टर्ड विमानाची सोय केल्याने मिलर, डी कॉक भडकला

मिलरची शानदार कारकीर्द

जेतेपद मिळत नसले तरी वैयक्तिक कामगिरीत मिलर कोणत्याही चॅम्पियन खेळाडूपेक्षा कमी नाही. त्याने दक्षिण आफ्रिकेकडून 178 एक दिवसीय सामने खेळले असून यात त्याच्या नावावर 4611 धावांची नोंद आहे. तर 140 टी-20 लढतीत त्याने 2804 धावा चोपल्या आहेत. तळाला येत डेव्हिड मिलरने आपल्या फटकेबाजीने दक्षिण आफ्रिकेला अनेक सामने जिंकून दिले आहेत, पण विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न 12 व्या प्रयत्नानंतरही अपूर्णच राहिले आहे.

Comments are closed.