लुथरा बंधूंना गोवा पोलिसांनी दिल्ली विमानतळावर अटक केली.

थायलंडमधून भारतात प्रत्यार्पित : आगीच्या दुर्घटनेनंतर काढला होता विदेशात पळ

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

गोव्यातील ‘बिर्च बाय रोमियो लेन’ या नाइट क्लबमधील अग्नितांडवाप्रकरणी मुख्य आरोपी सौरभ लूथरा आणि गौरव लूथरा यांना थायलंडमधून दिल्लीत आणले गेले आहे. भारतीय सुरक्षा अधिकारी या दोन्ही आरोपींसह मंगळवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. या विमानतळावर गोवा पोलिसांच्या एका टीमने दोन्ही आरोपींना अटक केली आहे. ट्रान्झिट रिमांडची अनुमती मिळताच पोलीस दोन्ही आरोपींसह गोव्यासाठी रवाना होणार आहेत.

सौरभ आणि गौरव लूथरा हे बिर्च नाइट क्लबचे मालक आहेत. या क्लबमध्ये 6 डिसेंबर रोजी आग लागल्यामुळे 25 जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर लूथरा बंधूंनी थायलंडमध्ये पळ काढला होता. थायलंड पोलिसांनी 11 डिसेंबर रोजी दोन्ही आरोपींना फुकेट येथून ताब्यात घेतले होते. तर मंगळवारी सकाळी बँकॉकमधून त्यांना भारतात प्रत्यार्पित करण्यात आले होते.

भारतीय सुरक्षा यंत्रणा ज्या आरोपींना शोधत आहेत, ते फुकेटमध्ये लपल्याची माहिती थायलंडच्या अधिकाऱ्यांना 9 डिसेंबर रोजी मिळाली होती. भारतीय यंत्रणांकडून इनपूट मिळाल्यावर थायलंडच्या अधिकाऱ्यांनी हॉटेल्सवर नजर ठेवण्यास सुरुवात केली होती. 11 डिसेंबर रोजी दोन्ही भाऊ हॉटेलमधून बाहेर खाण्यासाठी पडल्यावर थायलंड इमिग्रेशन आणि पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांची ओळखपत्रे तपासली आणि प्रवासाचा तपशील पडताळत त्यांना ताब्यात घेतले होते.

आग लागताच थायलंडसाठी तिकीट बुक

गोव्यातील नाइट क्लबमध्ये अग्निशमन दलाचे पथक आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करत असताना सौरभ आणि गौरव लूथरा यांनी थायलंडसाठी फ्लाइट तिकीट बुक केले होते. लूथरा बंधू 7 डिसेंबर रोजी पहाटे 5.30 वाजता इंडिगोच्या फ्लाइटने दिल्लीहून फुकेटसाठी रवाना झाले होते. गोवा पोलिसांनी विदेश मंत्रालय आणि सीबीआयच्या माध्यमातून इंटरपोलला या दोन्ही आरोपींना अटक करण्याची विनंती केली होती. यानंतर इंटरपोलने त्यांच्या विरोधात ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी केली होती.

Comments are closed.