2 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या राक्षसाला फाशी होणार आहे.
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
महाराष्ट्रात एका दोन वर्षीय मुलीचे अपहरण, बलात्कार आणि हत्येप्रकरणी दोषी ठरलेल्या इसमाची दयायाचिका राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी फेटाळली आहे. 25 जुलै 2022 मध्ये पदभार सांभाळल्यावर राष्ट्रपती मुर्मू यांनी फेटाळलेली ही तिसरी दयायाचिका आहे. रवि अशोक घुमारे या गुन्हेगाराने दोन वर्षीय मुलीवर बलात्कार करत तिची हत्या केली होती.
याप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर 3 ऑक्टोबर 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयाने देखील रवि अशोक घुमारेच्या मृत्यूदंडाची शिक्षा कायम ठेवली होती. दोषीने केवळ स्वत:ची वासना शमविण्यासाठी सर्व नैसर्गिक, सामाजिक आणि कायदेशीर शिक्षांना पार केले होते असे टिप्पणी न्यायालयाने केली होती. दोषीने एक असे जीवन निर्घृणपणे संपविले, जे अद्याप फुलायचे होते. दोन वर्षांच्या मुलीसोबत अनैसर्गिक गुन्हा करण्याचा उद्देश विकृत मानसिकता दर्शवितो, जो क्रूरतेची एक भयानक कहाणी सादर करत असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देत म्हटले होते.
दोषीने मुलीबद्दल पित्याप्रमाणे प्रेम आणि सुरक्षेचा भाव दाखविण्याऐवजी स्वत:च्या वासनेची तिला शिकार केली. या प्रकरणात विश्वास मोडण्यात आला आणि सामाजिक मूल्यांना ठेच पोहोचली असल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात तत्कालीन न्यायाधीश सूर्यकांत यांनी नमूद पेले होते. तर संबंधित गुन्हा 6 मार्च 2012 रोजी महाराष्ट्राच्या जालना शहरातील इंदिरा नगर भागात घडला होता. घुमारेने मुलीला चॉकलेटचे प्रलोभन देत तिच्यावर बलात्कार केला होता. कनिष्ठ न्यायालयाने 16 सप्टेंबर 2015 रोजी त्याला दोषी ठरवत मृत्युदंड ठोठावला होता. तर मुंबई उच्च न्यायालयाने जानेवारी 2016 मध्ये ही शिक्षा कायम ठेवली होती.
Comments are closed.