सर्वात बुद्धिमान साप

सर्पांना विशेष बुद्धीमत्ता आहे का आणि असल्यास ती किती प्रमाणात आहे, यावर सध्या मोठे संशोधन होत आहे. आपले भक्ष्य शोधण्याची आणि आपली स्वत:ची शक्य तितकी सुरक्षा करण्याइतपत बुद्धीमत्ता प्रत्येक सजीवतात असतेच. पण त्यापलिकडे जाऊन काही करण्याची सर्वाधिक बुद्धी ही माणसालाच मिळाली आहे. तथापि, काही प्राणी किंवा सर्पही बुद्धीमान असतात असे आढळून येते.

पृथ्वीवर विषारी सापांच्या अनेक प्रजाती आहेत. विषारी साप बिनविषारी सापांपेक्षा अधिक सतर्क आणि सजग असतात, असाही समज आहे. तसेच साप सूड उगवू शकतात आणि त्यांना त्रास देणाऱ्यांना ते लक्षात ठेवतात, असेही बोलले जाते. मात्र, ही समजूत संशोधनाअंती खोटी ठरली आहे. तरीही, सर्पांमध्ये सर्वात बुद्धीमान कोणती प्रजाती आहे, या प्रश्नाचे उत्तर ‘सर्पराज’ किंवा ‘किंग कोब्रा’ असे आहे. या प्रजातीची इतर वैशिष्ट्यो बहुतेकांना माहिती असतात. पण या प्रजातीच्या बुद्धीविषयी अलिकडच्या काळात नवी महिती मिळालेली आहे. किंग कोब्रा आपले संरक्षण करण्याच्या कामी इतर सापांपेक्षा बराच अधिक बुद्धीमान असतो. त्याला धोका अधिक लवकर कळतो आणि तो आपल्या संरक्षणासाठी आजूबाजूच्या परिस्थितीनुसार स्वत:च्या रणनीतीत परिवर्तन करतो, असे आढळून आले आहे.

त्याचे वीष अतिशय तीव्र असते. ते रक्तात भिनल्यास काही क्षणात मोठ्या प्राण्यांचाही मृत्यू होतो. वेळेवर उपचार न मिळाल्यास माणसेही त्याच्या वीषाच्या प्रभावातून सुटू शकत नाहीत. तथापि, हा सर्प नेहमी आपल्या शत्रूवर हल्लाच करतो, असे नाही. धोक्याची जाणीव होताच, तो प्रथम आसपासच्या स्थितीविषयी जाणून घेतो आणि स्वत:चा जीव वाचविण्याची रणनीती सज्ज ठेवतो. शत्रू अगदी समीप असल्यास आणि लपणे किंवा पळून जाणे यासाठी अवसर न मिळाल्यासच तो शत्रूचा चावा घेण्यास सरसावतो, अशी माहिती संशोधकांना मिळाली आहे.

 

Comments are closed.