नौदलाला यावर्षी 18 युद्धनौका मिळणार आहेत.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली माहिती
नवी दिल्ली : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी नौदलाच्या वरिष्ठ कमांडर्सना स्वत:च्या रणनीतिक तयारीला नव्या स्तरावर नेण्याचे आवाहन केले आहे. बदलते तंत्रज्ञान, अनिश्चितता आणि शेजारी देशांकडून निर्माण होणारी आव्हाने पाहता आता जुन्या प्रकारे काम चालू शकत नाही. कुठलेही संकट आमच्या दारापर्यंत पोहोचण्यापूर्वीच त्याला सामोरे जाण्याची पूर्ण तयारी असावी असे उद्गार राजनाथ सिंह यांनी काढले आहेत. वर्तमान वर्षात नौदलात 18 नव्या युद्धनौका सामील करण्याची योजना आहे. नौदलाच्या इतिहासात एका वर्षात सामील युद्धनौकांचा हा सर्वात मोठा आकडा ठरणार आहे. अलिकडेच नौदलात सामील करण्यात आलेल्या युद्धनौकांमध्ये 75 टक्क्यांपेक्षा अधिक स्वदेशी सामग्रीचा वापर करण्यात आला आहे. भारताने स्वत:च्या गरजा पूर्ण करण्यासोबत मित्रदेशांना युद्धनौका निर्यात करण्याच्या दिशेने पावले टाकावीत असे राजनाथ सिंह म्हणाले. आमच्या सैन्य तयारींमध्ये भू-रणनीतिक विचार आणि आकस्मिक परिस्थितींसाठी योजना सामील कराव्या लागतील. सागरी क्षेत्रात वाढलेली गर्दी, चाचेगिरी आणि ग्रे-झोन हालचालींमुळे सागरी सुरक्षा पूर्वीच्या तुलनेत अधिक जटिल ठरली आहे. अशास्थितीत देखरेख अन् प्रतिक्रिया क्षमता प्रभावी करण्याची गरज असल्याचे राजनाथ सिंह यांनी नौदलाच्या तीन दिवसीय कमांडर संमेलनाला संबोधित करताना म्हटले आहे. नौदल केवळ सागरी सीमांचे रक्षण करत नाही, तर नौदल विकसित भारताच्या परिकल्पनेचा आधार आहे. नौदल आर्थिक सुरक्षा, सागरी शक्ती-प्रक्षेपणातही भूमिका पार पाडत असल्याचे संरक्षण मंत्र्यांनी नमूद केले.
Comments are closed.