कुनो नॅशनल पार्कमध्ये भारतातील चित्त्यांची संख्या ५३ आहे

ज्वाला’ने दिला पाच बछड्यांना जन्म

वर्तमानपत्र/ नवी दिल्ली, कुनो

मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानातील नामिबियन मादी चित्ता ‘ज्वाला’ हिने पाच बछड्यांना जन्म दिल्याची माहिती केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी सोमवारी दिल्ली. ‘ज्वाला’ ही तिसऱ्यांदा यशस्वीरित्या आई झालेली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये केंद्रीय मंत्र्यांनी नव्या बछड्यांच्या जन्मासह, भारतात जन्मलेल्या निरोगी चित्त्यांची संख्या 33 झाल्याचे म्हटले आहे. तसेच आता या बछड्यांच्या आगमनाने भारतात चित्त्यांची एकूण संख्या 53 वर पोहोचली आहे.

भारतीय भूमीवर चित्त्यांची दहावी यशस्वी प्रजनन प्रक्रिया पार पडल्यामुळे भारताच्या चित्ता संवर्धन प्रवासात आणखी एक महत्त्वपूर्ण यश प्राप्त झाले आहे. केंद्रीय मंत्र्यांनी हा ‘प्रोजेक्ट चित्ता’साठी अत्यंत अभिमानाचा क्षण असल्याचे वर्णन केले आहे. ही कामगिरी पशुवैद्यकीय, क्षेत्रीय कर्मचारी आणि प्रकल्पाशी संबंधित असलेल्या प्रत्येकाच्या समर्पित प्रयत्नांचे, कौशल्यांचे आणि वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे. वन्यजीव संवर्धनासाठी हा एक ऐतिहासिक आणि हृदयस्पर्शी क्षण असल्याचे सांगून मंत्र्यांनी ज्वाला आणि तिचे बछडे तंदुरुस्त असल्याचेही स्पष्ट केले.

अलीकडेच, दक्षिण आफ्रिकेतील गामिनी ही चित्ता दुसऱ्यांदा आई झाली आणि तिने चार बछड्यांना जन्म दिला होता. याव्यतिरिक्त, 28 फेब्रुवारी रोजी, केंद्रीय मंत्र्यांनी बोत्सवानातून मिळवलेल्या सहा मादी आणि तीन नर अशा एकंदर नऊ चित्त्यांना मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानातील क्वारंटाइन एन्क्लोजरमध्ये सोडले होते. या चित्त्यांना सध्या हवामानाशी जुळवून घेण्याचे आणि आरोग्याचे निरीक्षण करण्याचे काम सुरू आहे आणि नंतर हळूहळू मोठ्या वनक्षेत्रात सोडले जाणार आहे.

Comments are closed.