आशियाई स्पर्धेत क्रिकेट कायम!

2026 च्या आशियाई खेळांमध्ये क्रिकेटचा पुन्हा एकदा समावेश करण्यात आला असल्याचे ऑलिम्पिक काऊन्सिल ऑफ एशियाने (ओसीए) बुधवारी जाहीर केले. म्हणजेच आशियाई क्रीडा स्पर्धेत चौथ्यांदा क्रिकेटचा समावेश होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ओसीएची 41 वी वार्षिक सर्वसाधारण सभा 28 एप्रिलला बँकॉक (थायलंड) येथे पार पडली. या बैठकीत 2026च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील खेळांच्या कार्यक्रमात क्रिकेट ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. 20 वी आशियाई क्रीडा स्पर्धा 2026मध्ये 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दरम्यान जपानमधील ऐची आणि नागोया येथे होणार आहेत. यामध्ये सुमारे 15 हजार खेळाडू सहभागी होतील. क्रीडा कार्यक्रमात क्रिकेट आणि मिश्र मार्शल आर्ट्स या दोन्ही खेळांना औपचारिक मान्यता देण्यात आली आहे, असे ‘ओसीए’ने सांगितले

2018मध्ये क्रिकेटला वगळले होते

आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचा समावेश चौथ्यांदा होणार आहे. 2010च्या ग्वांगझू आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचा पहिल्यांदाच समावेश झाला होता. त्यानंतर 2014 मध्ये इंचॉन येथील आशियाई स्पर्धेतही क्रिकेटचा समावेश होता. मात्र, 2018 मध्ये जकार्ता येथे झालेल्या आशियाई स्पर्धेतून क्रिकेटला वगळण्यात आले होते. मग पुन्हा 2022 मध्ये चीनच्या हांगझोऊ येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात आला, व हिंदुस्थानने विजेतेपद पटकाविले होते. यावेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) सर्व सामन्यांना आंतरराष्ट्रीय दर्जा दिला.

Comments are closed.